- October 15, 2022
- No Comment
महापालिकेतील अधिकारी सावधान, दिवाळीची भेटवस्तू स्वीकारली तर होइल पुढील कारवाई
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांनी दिवाळीची भेटवस्तूस्वीकारु नये.
जे अधिकारी व कर्मचारी भेटवस्तू घेताना आढळतील. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिला आहे. याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
महापालिका भवनामध्ये दिवाळीनिमित्त ठेकेदार, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या शुभेच्छा, भेटी-गाठी रंगतात. सुकामेव्याचे बॉक्स, मिठाई, शुभेच्छापत्रे, शोभेच्या, घरगुती वापराच्या भेटवस्तू, मॉलमध्ये खरेदीसाठीचे कुपन्स देऊन दिवाळीच्या ‘शुभेच्छा’ दिल्या जातात. परंतु, महापालिका अधिकाऱ्यांनी महापालिकेत अशा प्रकारे भेटवस्तू वाटपास मनाई केली आहे.
प्रभावी आणि लोकाभिमुख प्रशासन व्यवस्थेसाठी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे हे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 मधील कलम 12 नुसार कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने कोणतीही देणगी (भेटवस्तू) स्वतः स्वीकारता कामा नये. अथवा त्याच्या कोणत्याही कुटुंबियाला किंवा त्याच्या वतीने काम करणाऱ्या व्यक्तीला भेटवस्तू स्वीकारण्यास परवानगी देता कामा नये.