- October 15, 2022
- No Comment
दुहेरी खून खटल्यातील आरोपी छत्तीस तासात गजाआड
म्हाळुंगे: पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनने म्हाळुंगे एमआयडीसी चौकीच्या हद्दीत झालेल्या दुहेरी खून खटल्याचा शोध अवघ्या 36 तासात लावून आरोपीना गजाआड केले आहे.
अशी माहिती डॉ. काकासाहेब डोळे (पोलीस उप आयुक्त (गुन्हे) पिंपरी चिंचवड) यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
आरोपी प्रदीप भगत (वय 21 वर्ष, रा. सावरदरी, ता. खेड, जि. पुणे, मुळ रा. तालुका मंगरूळपीर, वाशिम) याला ताब्यात घेतले असून चाकण पोलीस स्टेशन अंतर्गत म्हाळुंगे चौकीच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मौजे म्हाळुंगे चौकीच्या हद्दीतील भक्ती अपार्टमेंट येथे 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सूरज चव्हाण व अनिकेत पवार यांच्या आपापसातील वादातून आरोपी प्रदीप भगत हा चाकूने वार करून पळून गेला. आरोपी भगत विरोधात भा.द.वि कलम 302 आर्म ऍक्ट 4, 27 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
चाकण औद्योगिक परिसरात झालेल्या दुहेरी खून हा गंभीर असल्याने सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट -3 कडील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना सूचना देऊन वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या होत्या. यातील एका टीमने घटनास्थळावरील परिसरातील आरोपीच्या संपर्कात असणाऱ्या नातेवाईक आणि मित्रांना ताब्यात घेऊन रात्रभर चौकशी केली. त्यामधून समोर आले की आरोपी हा आपल्या मूळ गावी गेला आहे. ही माहितीवाशिमला रवाना झालेल्या टीमला तातडीने देण्यात आली.
वाशिम येथे पाठविण्यात आलेल्या टीमने सलग 12 तास प्रवास करून वाशिम येथील आरोपीच्या मूळ गावी निंबा येथून आरोपीच्या राहत्या घरातून आरोपीचा भाऊ निलेश भगत (वय 22 वर्षे) व मामे भाऊ रोशन इंगवले (वय 23 वर्षे) यांना ताब्यात घेऊन कौशल्य पूर्वक तपास केला. त्यातून समोर आले, की आरोपी हा त्याच्या मामाच्या गावी रुई येथे राजू इंगवले याच्या शेताच्या तांड्यांमध्ये लपून बसला आहे. ही माहिती मिळताच पोलिसानी तातडीने शोध घेतला. त्या दरम्यान आरोपी जंगलामध्ये पळून गेला. तपास पथकाने तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने जंगल परिसरात रात्रभर शोध घेऊन प्रदीप भगत याला शिताफिने ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने सांगितले, की सुरज चव्हाण व अनिकेत पवार यांनी त्यांच्या बिल्डिंगमध्ये येण्यास विरोध केल्याच्या कारणावरून त्यांचा खून केला. आरोपीस रिपोर्टसह चाकण पोलीस ठाण्याअंतर्गत म्हाळुंगे पोलीस चौकीच्या ताब्यात देण्यात आले.