- December 23, 2024
- No Comment
अवघ्या ४० ते ५० मिनिटांत स्वारगेटपर्यंत; पिंपरी-चिंचवडकरांचा प्रवास झाला सुखकर
पिंपरी: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महामेट्रो) संचालित पुणे मेट्रो प्रकल्पाच्या टप्पा-१ स्वारगेट ते पिंपरी आणि वनाज ते रामवाडीचे काम सप्टेंबर २०२४ रोजी पूर्ण होऊन टप्पा-१ वरील प्रवासी सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मेट्रोची दैनंदिन प्रवासीसंख्या दीड लाखावर गेली आहे. अवघ्या ४० ते ५० मिनिटात स्वारगेटपर्यंत प्रवास करता येत असल्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांचा प्रवास सुखकर झाला आहे.
सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मार्ग:
६ मार्च २०२४ रोजी तिसऱ्या टप्प्यात रुबी हॉल ते रामवाडीपर्यंत (५.५ किमी, ४ स्थानके) आणि २९ सप्टेंबर रोजी सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट (३.५ किमी, ३ स्थानके) या भुयारी मेट्रो मार्गाचे लोकार्पण झाले. यामुळे पिंपरी ते स्वारगेट (१७.४ किमी, १४ स्थानके) आणि वनाझ ते रामवाडी (१५.७ किमी, १६ स्थानके) असे दोन्ही मिळून ३३ किलोमीटरचे मेट्रो मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाले.
पिंपरी ते निगडी या विस्तारित मार्गिकेचे काम:
स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड महापालिका हा मार्ग पुढे निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने २३ ऑक्टोबर २०२३ रोजी मान्यता दिली होती. त्यानंतर पुणे मेट्रो प्रशासनाने १६ डिसेंबर २०२३ रोजी बांधकामाची निविदा प्रसिद्ध केली. ६ मार्च २०२४ रोजी या विस्तारित मार्गाचे भूमिपूजन केले. प्रत्यक्ष कामाला मे २०२४ मध्ये सुरुवात झाली. पिंपरी ते निगडी भक्ती-शक्ती चौक या विस्तारित ४.५ किमी एलिव्हेटेड मार्गिकेचे काम जलद गतीने सुरू असून आतापर्यंत २८ ठिकाणी पाया बांधण्याचे, १३ पिलर, २०१ सेगमेंट कास्टिंग करण्याचे काम करण्यात येत आहे. अडीच वर्षांत हे बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
हिंजवडी-शिवाजीनगर काम ७० टक्के पूर्ण:
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महामेट्रोकडून हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.२०३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका तीनचे काम सुरू आहे. याचे काम सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाने हाती घेतले आहे. २३ जुलै २०२२ रोजी पहिला सेगमेंट हिंजवडी येथे उभारण्यात आला होता. या तिसऱ्या मेट्रो मार्गाचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू असून, सध्या ७० टक्के काम पूर्ण झाले असून वाकड आणि हिंडवडी फेज १ या भागात मेट्रो प्रशासनाने गर्डर आणि खांबावर पिअर कॅप बसविण्याचे काम हाती घेतले आहे. हे काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.