- December 23, 2024
- No Comment
पाटस येथे कंपनीचा लोगो वापरुन बनावट खताचा साठा अन् विक्री केल्याचा प्रकार उघडकीस; दुकानदारावर कॉपीराईटचा गुन्हा दाखल
एका कंपनीच्या नावाचा लोगो वापरुन खताचा साठा आणि विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाटस कुसेगाव रोडलगत असलेल्या श्री. सिध्देश्वर कृषी सेवा केंद्र या दुकानावर छापा टाकून 1 लाख 17 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पाटस पोलीसांनी दिली.
याप्रकरणी श्री. सिद्धेश्वर कृषी सेवा केंद्र आणि दुकानदार संतोष परशुराम ठोंबरे (रा. पाटस ता. दौंड जि. पुणे) याच्यावर कॉपीराईटचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रलशर बायो प्रोडक्ट प्रा.लि. या कंपनीच्या नावाचा लोगो वापरण्यात आला. या कंपनीतील सेल्स ऑफिसर असलेल्या वसंत पांडुरंग गुंजाळ यांनी पाटस पोलीस चौकीत फिर्यादी दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रलशर बायो प्रोडक्ट प्रा.लि. या कंपनीच्या अधिका-यांना यासंदर्भात माहिती मिळाली की, पाटस हद्दीत आपल्या कंपनीचे प्रोडक्ट असलेले प्लॅन्टो नावाची बनावट खते विकली जात आहेत. याबद्दल माहिती मिळताच कंपनीच्या अधिका-यांनी पोलीसांना माहिती दिली. तसेच पोलीसांसोबत जाऊन श्री. सिद्धेश्वर कृषी सेवा केंद्र दुकानात धाड टाकली.
त्या दुकानात धाड टाकल्यानंतर पोलीसांनी आणि कंपनीच्या अधिका-यांनी त्या दुकानातील खतांची तपासणी केली असता त्या ठिकाणी प्रलशर बायो प्रोडक्ट प्रा.लि. या कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग नसलेल्या मात्र कंपनीचे प्रोडक्ट प्लॅन्टो नावाचा वापर केलेल्या खताच्या गोण्या असल्याचे आढळून आले. न्यू प्लॅन्टो प्लस नावाच्या 50 किलो वजनाच्या प्रत्येकी एक हजार रुपये किंमतीच्या 48 बॅगा तसेच 25 किलो वजनाच्या प्रत्येकी 500 रुपये किंमतीच्या 138 बॅगा असा एकूण 1 लाख 17 रुपयांचा खताच्या पिशव्या असल्याच्या निदर्शनास आले. यावेळी हा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दुकानदार संतोष ठोंबरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख करत आहेत.