- October 21, 2022
- No Comment
खूनाच्या गुन्ह्यात फरार आरोपी जेरबंद
पुणे: खून व खूनाचा प्रयत्न अशा दोन्ही गुन्ह्यात फरार असलेल्या सराईताला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी दत्तवाडी परिसरात केली. प्रवीण उर्फ घाऱ्या चंद्रकांत खांबे (रा. दांडेकर पुल) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपीवर 9 ऑक्टोबर 2022 रोजी पानमळा येथे झालेल्या कृष्मकुमार चांदणे यांच्या खूनाचा आरोप होता. पोलीस त्याचा तपास घेत होते. यावेळी दत्तवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार कुंदन शिंदे,अमित सुर्वे, प्रशांत शिंदे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत खबर मिळाली की, खांबे हा त्याच्या मित्राला भेटण्यासाठी महालक्ष्मी मंदिर शिवदर्शन परिसरात येणार आहे. पोलिसांनी त्या अनुशंगाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता पूर्ववैमनस्यातून खून केल्याचे कबुल केले. त्यानुसार दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच 25 सप्टेंबर रोजी सिंहगड रोड येथे सनी चव्हाण याच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये झालेल्या मारामारीमध्ये सुकल मसराम याचा खून केल्याचेही समोर आले. खांबे हा पुणे पोलिसांच्या रडारवरील आरोपी आहे. त्याने 2014 साली एकाचे अपहरण करुन वरंधा घाट येथे नेत त्याचा खून केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल होता. गुन्हे केल्यापासून आरोपी हा त्याच्या मुळ गावी महाड येथे लपून बसला होता. साऱ्या प्रकारानंतचर तो पुण्यात मित्राला भेटायला आला असताना पोलिसांच्या गळाला लागला.खांबेवर गुन्हा दाखल केला असून दत्तवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.