- October 30, 2022
- No Comment
किरकोळ वादातून भावा भावाच्या भांडणात एकाचा खून
पुणे: धाकट्या भावाने दिलेल्या पैशाचा जाब विचारल्याने झालेल्या भांडणातून मोठ्या भावाचा चाकूने वार करून खून करण्यात आला. बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे घटना घडली.
कल्पेश अरुण धुळप (वय 26) असे खून झालेल्या मोठ्या भावाचे नाव आहे. तर, मंथन अरुण धुळप (वय 23) या धाकट्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुरेखा अरुण धुळप यांनी फिर्यादी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंथन धुळप त्याने मोठा भाऊ कल्पेश याला चप्पल व्यवसायासाठी आठ दिवसांपूर्वी एक लाख चाळीस हजार रुपये दिले होते. शुक्रवारी रात्री त्याने भावाला या पैशासंबंधी विचारणा केली. त्यावर कल्पेशने हे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याचे सांगितले. यावरून धोका भावात राग आला. कल्पेशने मंथन याला हाताने मारहाण केली. ते सहन न झाल्याने मंथन याने घरातील चाकू काढून कल्पेश त्याच्या मानेवर आणि छातीवर वार केले.
यामध्ये गंभीर जखमी झाल्याने कल्पेशचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मंथन याला अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.