- November 14, 2022
- No Comment
मार्केटयार्ड मधील दुकानावर दिवसा दरोडा टाकणा-या टोळीस केले जेरबंद
मार्केटयार्ड: पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात भर दिवसा शनिवारी (दि.12) गोळीबार करत एका दुकानावर दरोडा टाकण्यात आला होता. मावळ परीसरात लपून बसलेल्या सात आरोपींना पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक एक यांनी अवघ्या दोन दिवसात गजाआड केले आहे.
अविनाश उर्फ सनी रामप्रताप गुप्ता (वय 20 रा.मंगळवार पेठ), आदित्य अशोक मारणे (वय 28 रा. वारजे), दिपक ओम प्रकाश शर्मा (वय 19 रा. शिवणे), विशाल सतीश कसबे (वय 20 रा.मंगळवार पेठ), अजय बापू दिवटे (वय23 रा.वारजे), गुरुजी सिंह विरक (वय 22 रा.शिवाजीनगर) व निलेश बाळू गोठे (वय 20 रा. मंगळवारपेठ) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
मार्केटयार्ड सारख्य़ा गर्दीच्या ठिकाणी शनिवारी गणराज मार्केटमधील पी.एम.कुरीअर ऑफीसमध्ये पाच जण घुसले. त्यांनी हातात कोयता व पिस्टल रोखून धरले होते. यावेळी त्यांनी दहशत पसरवण्यासाठी हवेत गोळीबार करत उपस्थितांना जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी दुकानाच्या ड्रॉव्हरमधून 27 लाख 45 हजार रुपये रोख चोरून नेले.
या घटनेनंतर पोलीस खाते मात्र चांगलेच खडबडून जागे झाले. विविध पथके गुन्हेगारांच्या मागावर होती. यावेळी खंडणी विरोधी पथक सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना बातमीदार मार्फत संशयित आरोपी हे मावळ परिसरात लपून बसल्याचे खबर मिळाली. यावेळी पोलिसांनी मावळातील मोर्वेगाव येथील साई फार्म हाऊस येथे सापळा रचून सात जणांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांनी अन्य चारसाथीदारांसाह हा गुन्हा केल्याचे कबुल केले. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून 11 लाख 18 हजार रुपये रोख, गुनह्यात वापरलेले सात मोबाईल, कोयता, तीन दुचाकी असा एकूण 13 लाख 43 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपीवर मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्यांना पुढील तपासासाठी मार्केटयार्ड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई खंडणी विरोधी पथका एक चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, यशवंत ओंबासे, पोलीस अंमलदार मधूकर तुपसौंदर, सयाजी चव्हाण, प्रमोद सोनवणे, संजय भापकर, हेमा ढेबे, नितीन कांबळे, किरण ठवरे, दुर्यौधन गुरव, अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, संभाजी गंगावणे यांनी केली.