- December 2, 2022
- No Comment
राजस्थानमधलं हे गाव करतं देशभरात सेक्सटॉर्शन… अशी आहे
जामताडाप्रमाणेच राजस्थानमधलं (Rajasthan) एक संपूर्ण गावच सध्या चर्चेत आलं आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुभम वाडकर या विद्यार्थ्याने सेक्सटॉर्शनला (Sextortion) बळी पडून आत्महत्या केली होती. पुण्यातच (Pune) सेक्सटॉर्शनमुळे आणखी एका तरुणाने जीवन संपवलं. पुण्याप्रमाणेच देशभरात अशा अनेक घटना उघडकीस आल्या होत्या. मोबाईलवर तरुणींचे नग्न फोटो पाठवून त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते. पुण्यातील तरुणांच्या आत्महत्येचं प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेतलं आणि याचा तपास सुरु केला. ज्या मोबाईलवरुन या तरुणांना फोन करण्यात आले होते, त्याचा तपास सुरु केला असता त्याचे धागेदोरे राजस्थानपर्यंत पोहोचले.
राजस्थानमधलं सेक्सटॉर्शनचं गाव
राजस्थानमधील अलवार जिल्ह्यातील गोथरी गुरु (Gothri Guru) गाव. गावात एकूण 560 घरं आणि प्रत्येक घराचा व्यवसाय एकच ॲानलाईन गंडा (Online Fraud) घालायचा. देशातले अनेक नावाजलेले उद्योजक, न्यायाधीश, वकील यांना या गावाने सेक्सटॅार्शनच्या नावाखाली गंडा घातलाय. रक्कम काही हजारातून सुरू होते ते अगदी लाखो रूपयांपर्यंत मागितली जाते.
पुण्यात घडलेल्या दोन आत्महत्यांचं कारण हेच गाव. गावातील घरं मातीची असली तरी त्यांचं जगणं ऐशोआरामाचं आहे. घरात टीव्ही, एसी, महागड्या चारचाकी गाड्या दिसतात. गावाबाहेर बसलेली तरूणींची टोळी गावात कुणी नवीन आल की सगळ्या गावाला अलर्ट करतात. अगदी जमतारा वेबसिरीज मध्ये घडतं तसंच. पुणे पोलिसांनी या गावात जाऊन वेषांतर करून स्थानिक पोलिसांच्या मदतीने अन्वर सुभान खान या आरोपीला अटक केली.
तरुण-तरुणींना दिलं जातं ट्रेनिंग
संपूर्ण गावच हा व्यवसाय करायला लागल्यावर आजूबाजूच्या गावातल्या मुलांना ट्रेनिंग देण्याचे कोर्सेस ही या गावात चालवले जातात. जवळपास प्रत्येक घरातील महिला आणि पुरुष या व्यवसायात आहेत. प्रीती शर्मा किंवा प्रीत यादव या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून ही फसवणूक केली जायची. जमतारा वेबसिरीजला लाजवेल अशा पध्दतीने राजस्थान मधल्या ग्रामीण भागात हे सिंडीकेट चालवले जातात. त्यामुळे केवळ स्थानिक तपास यंत्रणाच नाही तर केंद्रिय तपास यंत्रणांच्या समोरही मोठं आव्हान आहे.
हे ही वाचा : Pune Sextortion Case : ऑनलाईन सेक्सट्रॉर्शनद्वारे खंडणी मागणाऱ्या मास्टरमाइंडला अटक
स्कॅमची व्याप्ती डोकं चक्रावणारी
या स्कॅमची व्याप्ती किती आहे हे ऐकून तुमचंही डोकं चक्रावल्याशिवाय राहणार नाही. कारण पुणे पोलिसांना या तपासाच्या प्रवासात जे जे भेटले ते या सेक्स्टॉर्शनचे बळी ठरल्याचं उघड झालं. पोलिसांनी आरोपी अन्वर खानला अटक केली आणि कोर्टात सादर केलं. त्या जिल्हा कोर्टातले अनेक न्यायाधीश, वकिल यांनाही गुरुकोठडी गावानं सेक्सटॉर्शनचा गंडा घातल्याचं समजलं. इतकंच नाही तर पुणे पोलीस ज्या ट्रेननं आरोपीला महाराष्ट्रात आणत होते त्या ट्रेनच्या टीसीलाही याच गावातल्या लोकांनी गंडा घातल्याचं पोलिसांनी सांगितलं.
अशी केली जाते फसवणूक
सोशल मीडियावर मुलींच्या नावाने फेक अकाऊंट तयार करुन तरुणांना जाळ्यात ओढलं जात होतं. त्यांच्याबरोबर गोडगोड बोलून तरुणांकडून त्यांचे मोबाईल नंबर मिळवले जातात. त्यानंतर त्यांना व्हिडिओ कॉल करुन तरुणींचे नग्न व्हिडिओ दाखवले जातात. समोरच्या तरुणालाही तसंच करायला भाग पाडलं जातं. त्यानंतर सुरु होता ब्लॅकमेलिंगाचा प्रकार. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तरुणांकडून काही हजारांपासून लाखो रुपयांपर्यंत पैसे उकळले जातात.