- December 4, 2022
- No Comment
दोन लाख ईमेल आयडी अन् एक लाखाहून अधिक फोन नंबर; बनावट जॉब रॅकेटचा पर्दाफाश, चार आफ्रिकन नागरिकांना अटक
बनावट जॉब रॅकेट चालवल्याप्रकरणी चार आफ्रिकन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे दोन लाख ईमेल आयडी आणि एक लाखाहून अधिक मोबाइल फोन नंबर असल्याची माहिती आहे.
बनावट जॉब रॅकेट चालवल्याप्रकरणी चार आफ्रिकन नागरिकांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे दोन लाख ई-मेल आयडी आणि एक लाखाहून अधिक मोबाईल फोन नंबर असल्याची माहिती आहे. ही माहिती पाहून मुंबई सायबर सेलच्या अधिकाऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे. या सगळ्या मोबाईल नंबर आणि मेलचा वापर नागरिकांना फसवणूक करण्यासाठी चार नागरिक करत होते. या रॅकेटमध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे.
चार आरोपी झांबिया, युगांडा, नामिबिया आणि घानाचे नागरिक आहेत. हे सर्व विद्यार्थी व्हिसावर भारतात आले होते आणि व्हिसाची मुदत संपल्यानंतरही यातील किमान तीन विद्यार्थी येथेच थांबले होते. अमेरिकेत नोकरी देण्याच्या बहाण्याने एप्रिल ते जुलै दरम्यान 26 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा दावा मुंबईतील एका व्यक्तीने बीकेसी येथील सायबर सेलकडे केला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. पोलिसांनी चार आरोपींना पुण्यातून अटक केली. आरोपीचे वय 22 ते 32 वर्षांच्या दरम्यान आहे. आरोपींकडे दोन लाख ई-मेल आयडी, 1,04,000 लोकांचे मोबाईल फोन नंबर्सचा डेटाबेस असून त्याचा वापर करुन ते लोकांची फसवणूक करत असल्याचे तपासात समोर आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
17 चेकबुक, 115 सिमकार्ड जप्त
पोलिसांनी 13 मोबाईल फोन, चार लॅपटॉप, विविध देशांचे पासपोर्ट, तीन इंटरनेट राउटर, विविध बँकांचे 17 चेकबुक, 115 सिमकार्ड, 40 बनावट रबर स्टॅम्प आणि किमान सहा बँकांचे खाते तपशील जप्त केले. भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 420 आणि 120 -बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
22 ते 32 वर्षाचे नागरिक
अटक करण्यात आलेले सगळे नागरिक 22 ते 32 वयोगटातील आहेत. त्यांच्याकडे सापडलेल्या वस्तू आणि मेल आयडी पाहून मुंबई सायबर सेलचे अधिकारीही अवाक् झाले आहेत. चारही विद्यार्थी अमेरिकेत नोकरी देण्याच्या बाहण्याने फसवणूक केली आहे. यासंदर्भात पोलिसांनी चौकशी सुरु केली होती. त्यानंतर त्यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं.
नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन
शहरात अनेकांकडून अशा प्रकारचं रॅकेट चालवलं जात आहे. त्यामुळे कोणत्याही आमिषांना बळू पडू नका किंवा कोणालाही पैसे पाठवण्याआधी संपूर्ण माहिती घ्या आणि काहीही संशयित आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.