- December 10, 2022
- No Comment
स्कूल बस चालकाचे विद्यार्थिनीशी गैरवर्तन,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
पिंपरी: शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन घरी जात असताना स्कूल बसचालकाने दोन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केले, यावरच तो थांबला नाही तर त्याने बस अती वेगाने चालवली ज्यामुळे बसमधून धूर निघाला व बस रस्त्यात बंद पडली.
सुदैवाने यात कोणालाही ईजा झाली नाही.हा प्रकार खराळवाडी येथे घडला आहे. याप्रकरणी संबंधित विद्यार्थिनीने फिर्याद दिली असून पिंकू कुमार (वय 30 , पत्ता माहिती नाही) च्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना बस चालकाने बसमध्ये मोठ-मोठ्याने गाणी लावले होते. यावेळी फिर्यादी यांच्या मैत्रणीने गाण्याचा आवाज कमी करण्यास सांगितला. यावर आरोपीने तुम्हाला काय करायचे आहे, मी मोठ्या आवाजात गाणी लावणारच म्हणत तो फिर्यादीकडे बघत मोठ्याने गाणी म्हणू लागला.त्यानंतर आरोपीला फोन आला असता तो फोनवर देखील मोठ्याने बोलू लागला. यावेळी फिर्यादीने आरोपीला आवाज कमी करण्यास सांगितले. यावेळी आरोपीने रागाच्या भरात फोन गाडीच्या बाहेर फेकून दिला व अतिशय वेगात गाडी चालवू लागला. त्यामुळे गाडी खराळवाडी येथील पोतदार शाळेच्या मागे आली असता ती बंद पडली.
यावेळी बसमधली मुले घाबरून खाली उतरली. यातच रस्त्यावरून जाणाऱ्या एका नागरिकाने बसमधून धूर येत असल्याचे सांगितले. यावरून फिर्यादी व त्यांची मैत्रिण यांनी आरोपीला जाब विचारला असता तो त्यांच्या अंगावर धावून आला व त्याने फिर्यादीच्या मैत्रिणीचा हात पकडत आता तुम्ही काय करणार म्हणत बॅड टच केला. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात चालका विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आहे. मात्र आरोपी अद्यापही फरार आहे. या घटनेमुळे स्कूल बस चालकांची मुजोरी व विद्यार्थ्यांची सुरक्षितता पुन्हा ऐरणीवर आली आहे.