- January 6, 2023
- No Comment
पूर्ववैमनस्यातून गुंडावर सराईत गुन्हेगारांनी कोयत्याने वार

पूर्ववैमनस्यातून गुंडावर सराईत गुन्हेगारांनी कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना खडकीतील महादेववाडी येथील सर्वधर्म समभाव मित्र मंडळ ते आंबेडकर चौक दरम्यान गुरुवारी रात्री साडेदहा वाजता घडली.
याप्रकरणी खडकीतील एका १७ वर्षाच्या मुलाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १२८/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मलंग कुरेशी, अमित फिरोज खान (वय २०, रा. कुबा हाईटस, घोरपडी), अॅलेक्स, दास व त्यांच्या तीन ते चार साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. अमित खान याला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहे. तसेच मंलग कुरेशी, अमित खान आणि अॅलेक्स हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. फिर्यादी आणि आरोपी हे ओळखीचे आहेत. फिर्यादी हा त्याच्या मित्रासोबत सर्वधर्म समभाव मित्र मंडळाजवळ बोलत थांबला होता. यावेळी पूर्वीच्या भांडणाचे कारणावरुन आरोपी मोटारसायकलवरुन आले.

त्यांनी हातातील लोखंडी रॉडने फिर्यादी यांच्या पायावर मारुन त्याला रस्त्यावर पाडले. मलंग कुरेश याने कोयत्याने डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा फिर्यादी याने हाताने तो अडविला असता फिर्यादीच्या हाताला जखम झाली. अमित खान याने कोयत्याने दंडावर वार करुन जखमी केले. फिर्यादी पळून जात असताना अॅलेक्स याने सिमेंटचा गठ्ठा उचलून फिर्यादीला फेकून मारला. इतरांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन कोयते हवेत फिरवत लोकांमध्ये दहशत पसरविली. पोलीस उपनिरीक्षक साळवी तपास करीत आहेत.




