- March 9, 2023
- No Comment
पुण्यात महिला दिनाच्या दिवशीच सासूने घेतला सुनेचा जीव
पुण्यात महिला दिनाच्या दिवशीच सासूने सुनेचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील सर्व कामं नीट करत नाही या क्षुल्लक कारणामुळे सूनेची हत्या केली आहे. अमानुषपणे सूनेचं डोकं आपटून हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पुण्यातील लोहगाव परिसरामध्ये ही घडली घटना आहे. या घटनेप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रितू रवींद्र माळवी (वय 28) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर या प्रकरणी तिची सासू कमला प्रभुलाल माळवी (वय-49) हिला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळवी कुटुंबीय हे पुण्यातील लोहगाव परिसरात राहतात. घरात सगळे कामं करावी लागतात आणि सून घरात व्यवस्थित काम करत नाही, यावरुन दोघींमध्ये अनेकदा वादावादी व्हायची. रोजच्या वादावादीमुळे घरात कायम चिंतेचं वातावरण असायचं. दोन दिवसांपूर्वी सासू घरातील फ्रिजचा दरवाजा उघडत होती. त्यावेळी सासूचा पाय चूकून सुनेला लागला. या कारणावरुन पुन्हा एकदा दोघींमध्ये भांडणं झाली. त्यानंतर सासूचा राग अनावर झाला. तिने सून रितूला मारहाण केली, सूनेचं डोकं खाली फरशीवर आपटलं. या घटनेत रितूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.