- April 24, 2023
- No Comment
दागिने बनविण्याच्या बहाण्याने एकोणतीस तोळे सोने घेऊन सर्राइत पसार
सांगवी: दागिने बनवून देतो असे सांगून दोघांनी एका सराफ व्यावसायिकाकडून 29 तोळे सोने नेले. त्यानंतर दोघेजण बेपत्ता झाले असून याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार 30 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत जुनी सांगवी येथील कावेडिया ज्वेलर्स आणि गणेश पेठ पुणे येथील प्रशांत गोल्ड स्मिथ नावाच्या दुकानात घडला.
रवी जगदीश कावेडिया (वय 36, रा. जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत सुनील समल (वय 40, रा . रविवार पेठ, पुणे), सुमन अजित ससमल (वय 23, रा. गणेश पेठ पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे ज्वेलर्सचे दुकान आहे. तर आरोपी यांचा सोन्याचे दागिने बनवून देण्याचा कारखाना आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून सोन्याचे दागिने बनवून देतो असे सांगून 296.430 ग्रॅम वजनाचे 17 लाख 84 हजार 508 रुपये किमतीचे शुद्ध सोने नेले. त्यानंतर दोघेजण बेपत्ता झाले. या प्रकरणी फिर्यादी यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.