- April 24, 2023
- No Comment
पूर्ववैमनस्यातून तरुणाला मारहाण, विरोध करण्यासाठी आलेल्या बहिणीवर कोयत्याने वार
पिंपरी: जुन्या भांडणाच्या कारणावरून सात जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. तरुणाच्या अंगावर रिक्षा घालून सुमारे 60 फूट फरफटत नेले. हे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या तरुणाच्या बहिणीच्या डोक्यात कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार यशवंतनगर, पिंपरी येथे घडला.
अनंत डेंगळे, दीपक कांबळे, नवनाथ डेंगळे, साहिल वाघमारे, तीन महिला (सर्व रा. यशवंतनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शंकर संभाजी चौधरी (वय 23, रा. यशवंतनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून फिर्यादीच्या अंगावर रिक्षा घालून त्यांना 50 ते 60 फूट अंतरावर फरफटत नेले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दहशत निर्माण केली. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांची बहिण आली असता आरोपींनी फिर्यादीच्या बहिणीच्या डोक्यात कोयता मारून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.