- May 4, 2023
- No Comment
तीन शाळकरी मुलींना चाॅकलेटचे आमिष दाखवून त्यांच्याशी अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीस पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
राजगुरूनगर : तीन शाळकरी मुलींना चाॅकलेटचे आमिष दाखवून त्यांच्याशी अश्लील चाळे करणाऱ्या वांजळे, ता. खेड येथील पोलिस पाटील गंगाराम नामदेव खंडे (वय ५९) याला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. राजगुरूनगर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.एम. राजूरकर यांनी मंगळवारी (दि. २) ही शिक्षा सुनावली.
या घटनेबाबत माहिती अशी की, वांजळे, ता. खेड येथील तीन शालेय मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून गावच्या पोलिस पाटलाने अश्लील वर्तन करण्याची घटना २०१६ मध्ये घडली होती. पोलिस पाटील गंगाराम नामदेव खंडे याच्याविरोधात भादंवि कलम ३५४ (अ)(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. इयत्ता पाचवीत व सहावीत शिक्षण घेणाऱ्या मुलींनी त्यांच्या आई-वडील, आजी आणि ग्रामस्थांसह येऊन खेड पोलिसांत तक्रार केली होती. इयत्ता पाचवीत शिकत असणाऱ्या गावातील दाेन मुली व सहावीत शिकणारी एक मुलगी अशा तीन मुलींना दुपारी राहत्या घरात चॉकलेटचे आमिष दाखवून बोलावून घेतले. दरवाजाला आतून कडी लावून पप्पी घेत तिघींच्या अंगावरून हात फिरवून अश्लील चाळे केले. ही घटना मुलींनी घरी येऊन कुटुंबीयांना सांगितली. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी येरवडा कारागृहात होता. राजगुरूनगर न्यायालयात हा खटला सुरू होता. त्यावर निकाल देण्यात आला. सरकारी वकील ॲड. पी.एस. आगरवाल यांनी फिर्यादी मुलींच्या बाजूने युक्तिवाद केला.