- May 24, 2023
- No Comment
उत्तर प्रदेशातून एका तरूणीला मुंबईत रेड लाइट एरियामध्ये विकण्यासाठी घेऊन आलेल्या एका जोडप्याला पोलिसांनी अटक केली आहे.
टिळक नगर पोलिसांनी एका जोडप्याला अटक केली आहे. ते उत्तर प्रदेशातून एका १८ वर्षीय तरूणीला मुंबईत रेड लाइट एरियामध्ये विकण्यासाठी घेऊन आले होते. त्या दोघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांना माहिती दिली. तसेच तिला महिला सुधारगृहात पाठवले. या जोडप्याने आतापर्यंत अशा किती मुलींना फसवले आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. आंचल शर्मा (20) आणि अमन शर्मा (21) अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही उत्तर प्रदेशातील आझमगडमधील खलीसपूर गावचे रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमन शर्माची पीडित तरूणीशी आझमगडमध्ये एक वर्षापूर्वी भेट झाली होती. आपण अविवाहीत असल्याचे सांगत अमनने वर्षभरापासून तिच्याशी प्रेमाचे नाटक केले. त्यानंतर त्याने तिला आपण घरातून पळून जाऊन मुंबईत लग्न करूया, असे सांगितले. त्या निष्पापण तरूणीने त्याच्यावर विश्वास ठेवत, प्रेमासाठी घर सोडण्यास तयारी दर्शवली. ते दोघेही १८ मे रोजी मुंबईसाठी रवाना झाले.
ट्रेनमध्ये त्या तरूणीला अमनसोबत एक स्त्री (आंचल) दिसली असता तिने त्याला ही कोण असे विचारले. त्यावर अमनने आपल्याच पत्नीची वहिनी म्हणून ओळख करून देत ती आपल्याला लग्नात आशिर्वाद देण्यासाठी येत असल्याचे सांगितले. अशाप्रकारे 20 मे रोजी तिघेही मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकावर पोहोचले
तेथे पोहोचल्यावर अमनने दोघींनाही स्टेशनवरच फ्रेश होण्यास सांगितले. यानंतर तो बाहेर गेला आणि तिथे उभ्या असलेल्या रिक्षाचालकाला विचारले की, जवळच रेड लाइट एरिया (वेश्यालय) कुठे आहे. एका मुलीला 40 हजार रुपयांना विकायचे आहे, असेही सांगितले. हे ऐकताच सावध झालेल्या रिक्षाचालकाने संधी मिळताच टिळक नगर पोलिसांशी संपर्क साधून सर्व प्रकार सांगितला.
त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) विलास राठोड यांनी उपनिरीक्षक बबन हराळ यांना तत्काळ घटनास्थळी पाठवले. तेथे त्यांनी त्या जोडप्याला आणि त्या मुलीला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केली. यानंतर मुलीने दिलेल्या जबाबाच्या आधारे दोन्ही आरोपींविरुद्ध अपहरण आणि मानवी तस्करीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. झोन-6 चे डीसीपी हेमराज सिंह राजपूत म्हणाले की, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.