- May 24, 2023
- No Comment
दिराने आपल्या वहिनीवर अत्याचार करूनतिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले
वहिनीवर अत्याचार करून मध्यरात्रीनंतर तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आले. ही थरारक घटना पारोळा रोडवर कृषी महाविद्यालयाजवळील नाल्यात रविवारी रात्री ८ ते सोमवारी पहाटे २:३० वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी पीडित महिलेने आझादनगर पोलिसात फिर्याद दाखल केली. संशयिताला जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले.
धुळे तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या दिराने आपल्या वहिनीला गावाहून धुळ्याकडे बोलावून घेतले. तिला पारोळा रोडवरील कृषी महाविद्यालयाजवळ असलेल्या नाल्याजवळ नेले. रविवारी रात्री ८ ते सोमवारी पहाटे २:३० वाजेदरम्यान तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर तिला बांधून ठेवले. एवढ्यावरच न थांबता त्या नराधमाने दुचाकीमधील पेट्रोल काढले आणि तिच्या अंगावर टाकून पेटवून दिले. तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
या थरारक घटनेनंतर तो नराधम घटनास्थळावरून पसार झाला. पेटल्यानंतर जिवाच्या आकांताने पीडित महिला मदतीसाठी आरडा ओरड करू लागली. आवाज ऐकून कृषी महाविद्यालयाच्या सुरक्षारक्षकाने घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच उपाधीक्षक ऋषिकेश रेड्डी, आझादनगर पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी तिला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या पीडित महिलेवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, संशयिताविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.