- July 1, 2023
- No Comment
क्राईम ब्रांचचा अधिकारी असल्याचे सांगून करत होता फसवणूक; तडीपार इराणी गुन्हेगारा गजाआड
पिंपरी: क्राईम ब्रांचचा अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना लुटणाऱ्या तसेच फसवणूक करणाऱ्या तोतया अधिकाऱ्याला गुन्हे शाखा युनिट दोनने अटक केली. या आरोपीला पोलिसांनी तडीपार केले होते.
या आरोपीकडून चार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
आबालु जाफर इराणी (रा. इराणी वस्ती, शिवाजीनगर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 मे रोजी मजुरी काम करणारे आण्णा नाना पवार (वय 52, रा. हिंजवडी) हे रेशन व सिलेंडर टाकी घेण्यासाठी दुचाकीवरुन नारायणगाव येथे जात होते.
पुणे नाशिक रोडवर चाकण येथे अचानक पाठीमागून स्पोर्ट बाईकवरुन आलेल्या एका इसमाने धमकावले. दोन-तीन वेळा हाका मारुन सुद्धा थांबला नाहीस असे म्हणून गाडी साईडला घेण्यास सांगितली. आण्णा पवार यांनी घाबरुन गाडी साईडला घेतली असता क्राईम ब्रांच पोलीस अधिकारी असल्याचे कार्ड दाखवून गांजाची चेकींग चालू आहे असे सांगून त्यांची अंगझडती घेतली.
खिशातील मोबाईल, पैसे, डायरी, गळ्यातील चैन असे गाडीच्या डीकीत ठेवण्याचा बहाणा करून हातचलाखीने 36.650 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरुन नेली.
3 जून रोजी भोसरी येथील पुलाखाली वृध्द्ध महीला कलावती बबनराव कांबळे (वय 62, रा. विश्रांतवाडी पुणे) या नातीला उसाचा रस पाजुन घरी निघाल्या असताना एका इसमाने त्यांच्याजवळ येवून 30 तोळ्याचे सोन्याचे गाठोडे पडले आहे. तुम्हाला सापडले का? असे विचारले पुन्हा दुस-या इसमाने येवून तिस-या इसमाकडे बोट दाखवून त्याला सोन्याचे गाठोडे मिळाले आहे त्याला दोन – दोन लाख रुपये देऊ व सोने वाटून घेऊ. अशा भूलथापा मारल्या.
वृद्ध महिलेने पैसे नसल्याचे सांगितले असता तिच्या गळयातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे गंठन देण्यास सांगून बनावट सोन्याचा तुकडा देवून फसवणुक करुन आरोपी पसार झाले.
वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अशा घटना घडणाऱ्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि आरोपींची ओळख पटवली. हे गुन्हे करणारा इराणी व्यक्ती असून तो पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहे. त्याला पुणे पोलिसांनी तडीपार देखील केले आहे. त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने हे गुन्हे केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
29 जून रोजी आबालु इराणी हा निगडी परिसरात आला असल्याची माहीती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्याची चार ओळखपत्रे आढळून आली. त्याच्याकडून पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी असा एकूण चार लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
फसवणुक करणारा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याने पुणे, सातारा, नाशिक, ठाणे जिल्हा, भाईंदर, खंडाळा, भोईसर या ठिकाणी एकूण 20 गुन्हे केलेले आहेत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक गणेश माने, गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अंमलदार शिवानंद स्वामी, केराप्पा माने, उषा दळे, देवा राऊत, विपुल जाधव, आतिष कुडके, नामदेव कापसे, अजित सानप, शिवाजी मुंढे, उध्दव खेडकर, संदेश देशमुख यांनी केली आहे.