- July 1, 2023
- No Comment
पिंपरीमध्ये सुरु होणार वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील दाव्यांची संख्या, न्यायालयावरील ताण लक्षात घेत पिंपरी मध्ये वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सुरु करण्यास मंजुरी मिळाली आहे. पुढील महिन्यात याचे कामकाज सुरु होणार आहे.
याबाबत पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनने जिल्हा न्यायालयाच्या माध्यमातून उच्च न्यायालयाकडे पाठपुरवा केला. त्यास यश आले आहे. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सुरु होणार असल्याने जिल्हा सत्र न्यायालय देखील सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष ॲड. जयश्री विलास कुटे आणि कार्यकारिणीने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा पुणे जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांची मुंबई उच्च न्यायालयात भेट घेतली.
यावेळी बार काउंन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य ॲड. हर्षद निंबाळकर, पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. विलास कुटे, सचिव ॲड. गणेश शिंदे, सदस्य ॲड. स्वप्निल वाळुंज, ॲड. सौरभ जगताप, ॲड. नितीन पवार, ॲड. मंगेश खराबे, ॲड. सत्यम निंबाळकर आदि उपस्थित होते.
पिंपरी न्यायालय नेहरूनगर येथे स्थलांतरित झाले आहे. नेहरूनगर येथील न्यायालयात अकरा न्यायालये चालविण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र सद्यस्थितीत इथे पाच न्यायालयांचे काम सुरु आहे. त्यामुळे आणखी सहा न्यायालये सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे.
प्रॉपर्टीच्या किमतीवरून दावा कुठल्या न्यायालयात चालणार हे ठरते. पाच लाखांपेक्षा अधिक किमतीचे दावे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात चालतात. पिंपरी न्यायालयात आता सर्व कनिष्ठ स्तर न्यायालये आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 55 टक्के दिवाणी स्वरूपाचे दावे पुणे न्यायालयात जातात. त्यामुळे पिंपरी न्यायालयात तीन वरिष्ठ स्तर दिवाणी आणि तीन जिल्हा सत्र न्यायालये सुरु करण्यासाठी बार असोसिएशनकडून पाठपुरावा केला जात आहे.
बार असोसिएशनच्या माध्यमातून पिंपरी नेहरूनगर न्यायालयात वरिष्ठ न्यायालय तसेच जिल्हा न्यायालय स्थापन करण्यासाठी पालक न्यायमूर्तींना निवेदन देण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या, पुणे न्यायालायीनप्रलंबित खटले लक्षात घेता पिंपरी मध्ये वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय आणि जिल्हा सत्र न्यायालय सुरु करणे आवश्यक असल्याचे बार असोसिएशनने सांगितले.
पिंपरी न्यायालयात नवीन न्यायालय सुरु करण्यासाठी सर्व सुविधा असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले. यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी पुढील महिन्यात पिंपरी येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करून कामकाज त्वरित सुरु करण्याचे आश्वासन दिले.
पिंपरी-चिंचवड न्यायालय मोशी येथे प्रस्तावित आहे. त्या कामासाठी निधी मंजूर झाला असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणे बाकी आहे. त्यामुळे या न्यायसंकुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्याबाबत आढावा घेऊन पुढील महिन्यात भूमिपूजन करण्याबाबत देखील न्यायमूर्ती मोहिते डेरे यांच्याशी चर्चा झाली आहे.
जिल्हा सत्र न्यायालय सुरु करण्यासाठी अगोदर वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सुरु होणे आवश्यक असते. वडगाव मावळ येथे सुरुवातीला कनिष्ठ स्तर न्यायालये होती. त्यानंतर वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सुरु झाले. त्याच्या सहा ते सात महिन्यानंतर वडगाव मावळ न्यायालयात जिल्हा सत्र न्यायालय सुरु करण्यात आले आहे.
वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाकडून उच्च न्यायालय दाव्यांची आकडेवारी मागवून घेते. त्यानंतर त्याचा विधी व न्याय विभागाकडे पाठपुरावा करून मंजुरी घेतली जाते. पिंपरी येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सुरु होणार असल्याने पुढील काही महिन्यात जिल्हा सत्र न्यायालय देखील सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे.