- July 2, 2023
- No Comment
कर्ज 45 हजार, परतफेड साडे चार लाख तरी दिड लाखांची मागणी करणाऱ्या सावकाराला बेड्या,खंडणी विरोधी पथक 2 गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी
पिंपरी: विनापरवाना सावकरकी करणे कायद्याने गुन्हा आहे हे माहिती असताना देखील आवाजवी व्याजदराने कर्ज देणे व घेणे आजही सुरु आहे. पुण्यात एका नोकरदार इसमाने खासगी सावकाराकडून 20 टक्के व्याजदराने 45 हजार रुपयांचे कर्ज काढत तब्बल 4 लाख 50 हजार भरले तरी आणखी दीड लाख रुपयांची मागणी करत त्रास देणाऱ्या खाजगी सावकाराच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
सुरज मनोज परदेशी (रा. गुजरवाडी, कात्रज) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपी हा विनापरवाना होम लोन व मॉरगेज लोनचा व्यवसाय करतो. त्याने फिर्यादी यांना 45 हजार रुपयांचे लोन 20 टक्के व्याजदराने दिले होते. त्या बदल्यात फिर्यादी यांनी आरोपीला परतफेड म्हणून 4 लाख 50 हजार रुपये दिले तरी देखील 1 लाख 53 हजारांची मागणी करत पैसे दिले नाहीत तर बदनामीची धमकी दिली. यावरून पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्यावर वित्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
तर दुसऱ्या घटनेत एका दुग्ध व्यावसायीकाला अवाजवी व्याजदर आकारणाऱ्या दोन सावकांरानाही पोलिसांनी अटक केली आहे. यश संजय मेमाणे व मानव संजय मेमाणे (दोघे. रा.रविवारपेठ, पुणे) यांना अटक केली आहे.फिर्यादी यांनी आरोपींकडून 10 टक्के व्याजदरावर 1 लाख 90 हजार रुपायांचे कर्ज घेतले होते. त्याबदल्यात फिर्यादी यांनी त्यांचा टेम्पो आरोपीकडे गहाण ठेवला होता.
परतफेड म्हणून फिर्यादी यांनी 1 लाख 71 हजार रुपये परत केले तरीही आरोपींनी फिर्यादी यांचा टेम्पो परत देण्यास नकार देत आणखी 2 लाख रुपयांची मागणी केली.याविरोधात फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर खडक पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
या दोन्ही कारवाई पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक 2 गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.