- July 2, 2023
- No Comment
वाहन चोरी आणि विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या सराईतांना अटक; दहा गुन्हे उघड
पिंपरी: वाहन चोरी आणि चोरीची वाहने विक्री करणाऱ्या पाच जणांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सहा लाख 60 हजार रुपयांची 14 दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. सदरची कारवाई मोरवाडी कोर्टजवळ, पिंपरी येथे करण्यात आली.
दादासाहेब उर्फ दाद्या प्रकाश पटेकर (वय 19 रा.अहमदनगर), योसेफ शमुवेल खंडागळे (वय 22 रा.बोपखेल), आकाश प्रकाश पटेकर (वय 23, अहमदनगर), आदित्य अनिल देशमुख (वय 23, रा. जालना), सुनिल ऊर्फ गोट्या सुरेश वाळेकर (वय 25, रा. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गस्त घालत असताना पोलिसांना केएसबी चौकाकडून मोरवाडी कोर्टाकडे जाणाऱ्या रोडवर दोन दुचाकीवरून तिघेजण नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून संशयीतरित्या फिरत होते. पोलिसांना बघताच ते पळून जात होते पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना पकडले.
त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडील गाडी चोरीची असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्यांच्याकडून 6 लाख 60 हजार रुपयांच्या 14 दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपीवरील वाहन चोरीचे पिंपरी पोलीस ठाण्यातील दोन, खडकी येथील दोन, दिघी, भोसरी, विमानतळ पोलीस ठाणे, विश्रांतवाडी, पुणे रेल्वे पोलीस ठाणे, शिक्रापूर अशा दहा गुन्ह्यांची पोलिसांनी उकल केली आहे.
सदरची कामगिरी पिंपरी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रुपाली बोबडे, पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे, शाकिर जिनेडी, सहायक पोलीस फौजदार प्रमोद भांडवलकर, पोलीस अंमलदार राजेंद्र बारशिंगे, शांताराम हांडे, वसंत बेंदरकर, जावेद बागसिराज, गणेश करपे, सोमेश्वर महाडिक, विष्णू भारती, ओंकार बंड, जावेद मुजावर, भाग्यश्री जमदाडे, मोहसिन शेख, विजय जानराव, रोहित वाघमारे, विकास रेड्डी, समिर ढवळे, आनंद बजबळकर, सुरज ढोकले, दत्ताजी कवठेकर यांनी केली.