- September 5, 2023
- No Comment
राठी हत्याकांडातील मुख्य आरोपी आणि २८ वर्षे तुरुंगात काढल्यावर फाशीची शिक्षा रद्द झाल्याने तुरुंगाबाहेर आलेल्याला वाकड पोलिसांनी अफीम या अंमली पदार्थांची तस्करी करताना अटक
पिंपरी : पुणे शहराला हादरविणाऱ्या राठी हत्याकांडातील मुख्य आरोपी आणि २८ वर्षे तुरुंगात काढल्यावर फाशीची शिक्षा रद्द झाल्याने तुरुंगाबाहेर आलेल्याला वाकड पोलिसांनी अफीम या अंमली पदार्थांची तस्करी करताना अटक केली आहे. त्याच्याकडून तीन लाख ५९ हजार रुपये किंमतीचे अफीम जप्त करण्यात आले आहे.
नारायण चेतनराम चौधरी (वय ४१, रा.जालबसर, बिकानेर, राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वाकड पोलीस हे सराईत गुन्हेगारांची तपासणी करत होते. मुंबई-पुणे महामार्गालगत नारायण हा थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याच्याकडील पिशवीत अफीम हा अंमली पदार्थ होता. त्याच्याकडून तीन लाख ५९ हजार रुपये किंमतीचा ८९८ ग्रॅम वजनाचा अफीम जप्त करण्यात आला. त्याने राजस्थानमधून अफीम आणल्याचे सांगितले. त्याने व त्याच्या साथीदारांनी २६ ऑगस्ट १९९४ मध्ये कोथरूडमधील एकाच कुटुंबातील सात सदस्यांची निघृणपणे हत्या केली होती
नारायण याला ५ सप्टेंबर १९९४ रोजी राजस्थान येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आरोपी व त्याच्या साथीदारांना १९९८ मध्ये फाशीची शिक्षा झाली होती. नारायण हा गेल्या २८ वर्षांपासून राज्यातील वेगवेगळ्या कारागृहात होता. २७ मार्च २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नारायण हा गुन्ह्याच्यावेळी अल्पवयीन असल्याने फाशीची शिक्षा रद्द करून त्याला मुक्त केले होते. कारागृहातून सुटल्यानंतर तो राजस्थान येथे गेला होता. तो पुण्यात अफीम या अंमली पदार्थाची तस्करी करण्याकरीता आला होता. नारायण याला ६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे