- September 8, 2023
- No Comment
इन्शुरन्स पॉलिसी काढली तर त्यावर शुन्य टक्क्याने ५ कोटी रुपये लोन करून देतो असे सांगत एका ४९ वर्षीय इसमाची ६८ लाख ३५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक
पुणे : इन्शुरन्स पॉलिसी काढली तर त्यावर शुन्य टक्क्याने ५ कोटी रुपये लोन करून देतो असे सांगत एका ४९ वर्षीय इसमाची ६८ लाख ३५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याप्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी भामट्याने वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून फोन करून विश्वास संपादन करत फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अमित प्रकाश जोशी (४९ रा. सहकारनगर) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून, हा प्रकार २०२१ ते ६ सप्टेंबर २०२३ पर्यंतच्या काळात घडल्याचे सांगण्यात आले आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंबई येथील कमलेश तुकाराम घुलघुले याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार जोशी यांना आरोपी कमलेश याने स्टारयुरेका इन्शुरन्स मार्केटिंग प्रा. लि. कंपनीतून अनेकदा वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरुन फोन करून इन्शुरन्स पॉलिसी काढली तर शुन्य टक्के व्याजाने ५ कोटी रुपयांचे लोन देतो असे सांगितले
त्यानंतर जोशी यांचा विश्वास संपादन करून वेगवेगळ्या विमा कंपन्यांच्या १.६४ कोटी रुपयांच्या पॉलिसी काढण्यास भाग पाडले, त्यानंतर जोशींना कोणत्याही प्रकारचे कर्ज न दिल्याने त्यांनी संबंधित इन्शुरन्स कंपनीच्या संचालकाकडे याबाबत विचारणा केली. यानंतर संचालकाने पॉलिसी रद्द करून सर्व प्रिमियम परत देण्याचे जोशी यांना आश्वासन दिले. मात्र अमित जोशी यांना कोणत्याही प्रकारचे पैसे परत न आल्याने त्यांना आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सरवदे करत आहेत.