- September 18, 2023
- No Comment
मुलाचे अपहरण करुन खून करणाऱ्या ओंकार कापरे टोळीवर मोका
पुणे : अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन त्याचा खून करणाऱ्या ओंकार चंद्रशेखर कापरे याच्यासह टोळीतील इतर दहा साथीदारांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांन्वये कारवाई केली.
फिर्यादी यांचा १६ वर्षीय मुलगा दोन सप्टेंबर रोजी रात्री कोंढवा खुर्द येथील ढोलपथकात सरावासाठी गेला होता. मात्र, तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी कोंढवा पोलिस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन मुलाचा शोध घेतला. त्यावेळी बेपत्ता मुलाचा मृतदेह दिवेघाटाजवळ आढळून आला होता. नील खवळे याला आमची टीप देतो या कारणावरुन आरोपींनी मुलाचे कोंढव्यामधून मोटारीतून अपहरण केले. मंतरवाडीजवळ लाकडी दांडक्याने मारहाण करून मुलाचा खून केला. या प्रकरणी पोलिसांनी टोळी प्रमुख ओंकार चंद्रशेखर कापरे (वय २७, रा. कोंढवा खुर्द), साईराज राणाप्रताप लोणकर (वय २३, रा. उंड्री), प्रणय सुनील पवार (वय १९), सौरभ ऊर्फ दत्ता माणिक तायडे (वय १८), कृष्णा प्रकाश जोगदंडे (वय २०), महादेव ऊर्फ पप्पू गोविंद गजाकोष (वय १९), रोहन अनिल गवळी (वय २१, सर्व रा. कोंढवा खुर्द) यांना अटक केली.
दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर, राज ठोंबरे आणि अमन (पूर्ण नाव नाही) हे फरार आहेत. आरोपींवर खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे कोंढवा व वानवडी पोलिस ठाण्यात दाखल आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) संदीप भोसले यांनी पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यामार्फत अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे मोकाचा प्रस्ताव दिला होता. पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त शाहूराजे साळवे करीत आहेत