- October 27, 2023
- No Comment
नामांकित कंपनीचे लोगो वापरून होतेय बनावट कपड्यांची विक्री
लोणी काळभोर: अवघ्या काही दिवसांवर आलेल्या सणानिमित्त पूर्व हवलीतील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. मात्र या खरेदीत आपण ज्या वस्तू खरेदी करत आहोत त्या बनावट तर नाहीत, याची खात्री करणे आवश्यक आहे. बनावट वस्तु उत्पादनांना नामांकित कंपनी उत्पादनांचा लोगो चिकटवून त्या ग्राहकांच्या माथी मारल्या जात असल्याचे चित्र सध्या लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन या परिसरात निदर्शनास येत आहे. त्यामुळे दिवाळीची खरेदी करताना नागरिकांनी काळजीघ्यायला हवी.सध्या दिवाळीच्या खरेदीची धमाल सुरू आहे. खाद्य पदार्थासह मोबाइल फोन, घड्याळे, जीन्स पॅन्ट, कपडे, बूट अशा दररोजच्या वस्तूंची सर्रास खरेदी केली जाते. परिसरातील
दुकाने तुडुंब भरली आहेत. दुकानदार जो माल देईल तो त्याच कंपनीचा आहे, असे समजून तो ग्राहक खरेदी करतात. परंतु खूप मोठ्या प्रमाणावर नामांकित वस्तूंचा लोगो वापरून बनावट उत्पादनांची विक्री होत आहे. यातून ग्राहकांची फसवणूक होते.
कॉपीराईट कायद्यानुसार संबंधित व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे.
काय आहे कॉपीराईटकायदा
बौद्धिक संपदेचा अधिकार म्हणजे स्वामित्व कायदा होय. लेखकाच्या किंवा
निर्मात्याच्या त्यांनी निर्माण केलेल्या मूळ कार्याचे संरक्षण करणे म्हणजे
कॉपीराइट कायदा. स्वतः तयार केलेल्या गोष्टींवर त्या तयार करणाऱ्यास या
कायद्यानुसार मालकी हक्क मिळतो. या कायद्यात सर्वकाही येऊ शकते.
कलाकृती, कविता, कादंबरी, पेंटिंग, चित्रपट, व्हिडिओ, संगीत, गाणी,
म्युझिक रेकॉर्डिंग, संगणक प्रणाल्या, पुस्तके, वेबसाइट्स, यासह ज्याची
स्वतः कोणी निर्मिती केली आहे अशा सर्व बाबींचा यात समावेश होतो. यात
एक व्यक्ती, संस्था, संघटना, कंपनी, आस्थापना यांचा समावेश असू
शकतो. एखाद्या वस्तूची, गोष्टीची मालकी त्यांच्याकडे असू शकते. या
मालकीचे संरक्षण कायदेशीर करणे म्हणजेच कॉपीराईट कायदा होय.