- October 27, 2023
- No Comment
केबल टाकण्याचे काम करणाऱ्याकडे खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक
पुणे : इंटरनेटची केबल टाकण्याचे काम करणाऱ्याकडे खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक केली आहे. दहा हजार रुपये खंडणीची मागणी करुन चार हजार रुपये स्वीकारताना पोलिसांनी आरोपींना अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि.25) दुपारी अडीचच्या सुमारास दिप बंगला चौकात केली.
याबाबत निखील बाजीराव भोरडे (वय-33 रा. कोथरुड) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर निखील शिवा कांबळे (वय-19), अतुल अनिल धोत्रे (वय-21), तेजस शिवाजी विटकर (वय-21) यांच्यावर आयपीसी 384, 385, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखिल भोरडे हे इंटरनेटची केबल टाकण्याचे काम करतात.
फिर्यादी यांचे कामगार इंटरनेटची एरीयल फायबर टाकण्याचे काम करत होते. त्यावेळी निखील कांबळे व अतुल धोत्रे हे
काम सुरु असलेल्या ठिकाणी आले. त्यांनी जबरदस्तीने काम थांबवून तुम्ही आमची परवानगी घेतली का असे म्हणत
वडारवाडी, पांडवनगर भागात आमच्या परवानगी शिवाय कोणी केबलचे काम करत नसल्याचे सांगितले. तसेच तुम्हाला जर काम करायचे असेल तर दर महिना 10 हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणत खंडणीची मागणी केली. फिर्यादी यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी बुधवारी दुपारी दिप बंगला चौकातील हॉटे रेड पान्डा येथे सापळा रचून फिर्य़ादी यांच्याकडून 4 हजार रुपयांची खंडणी घेताना आरोपींना रंगेहाथ पकडले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक केकाण करीत आहेत