- October 27, 2023
- No Comment
व्यावसायिक वादातून एकावर कोयत्याने वार, मार्केट यार्ड परिसरातील घटना
पुणे : व्यवसायातील आर्थिक देवाण-घेवाणीवरुन झालेल्या वादाचा राग मनात धरुन पाच जणांच्या टोळक्याने एका व्यक्तीवर कोयत्याने वार करुन दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार बुधवारी (दि.25) दुपारी दीडच्या सुमारास मार्केट यार्ड येथील देवीच्या मंदिरासमोर घडला. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
सचिन भिमराव आढाव (वय-40 रा. कात्रज-कोंढवा रोड, गोकुळनगर) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी बाळासाहेब मारणे , त्यांचा मुलगा रोहीत मारणे , प्रविण, अली, बाळा तापडीया (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन आढाव आणि आरोपी बाळासाहेब मारणे हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांनी भागिदारीमध्ये व्यवसाय सुरु केला आहे. मात्र, व्यवसायातील आर्थिक देवाण-घेवाण वरून त्यांच्यात वाद झाले होते. त्यामुळे फिर्यादी हे आरोपी बाळासाहेब याच्यासोबत बोलत नाहीत. याचा राग मनात धरुन बाळासाहेब मारणे याने फिर्यादी यांना फोनवरून शिवीगाळ केली.
तर इतर आरोपींनी मार्केट यार्ड येथे येऊन फिर्यादी यांना बेस बॉलच्या स्टिकने मारहाण केली.
बाळासाहेब मारणे यांचा मुलगा रोहीत मारणे याने कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्यात वार केले.
तर इतर आरोपींनी दगडाने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत फिर्यादी सचिन आढाव हे गंभीर
जखमी झाले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत