- February 1, 2024
- No Comment
स्वारगेट एसटी स्टॅन्ड परिसरातून प्रवाशांचे दागिने चोरणार्या महिलेला स्वारगेट पोलिसांकडून अटक
पुणे : स्वारगेट एसटी स्टॅन्ड परिसरातून प्रवाशांचे दागिने चोरणार्या महिलेला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याकडून 33 ग्रॅम वजनाचे 2 लाख 30 हजार रूपये किंमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
कार्तीका शरमा चव्हाण ( रा. गाडेवस्ती, खानापुर, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की भगवान शेटीबा आतार हे दि. 21 जानेवारी 2024 रोजी स्वारगेट एसटी स्टॅन्ड येथे बसमध्ये चढत असताना चोरटयाने त्यांच्या गळयातील 20 ग्रॅम वजनाची चेन चोरून नेली होती. त्यांनी याबाबत स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
स्वारगेट पोलिस स्टेशनमधील तपास पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत संदे आणि पोलिस अंमलदार सुजय पवार, संदीप घुले, शिवा गायकवाड यांनी स्वारगेट एसटी स्टॅन्डमध्ये जावून सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषण करून माहिती काढली. दरम्यान, पोलिस पेट्रोलिंग करीत असताना एक महिला संशयास्पदरित्या फिरत होती. महिला पोलिस अंमलदार खामगळ यांनी इतर सहकार्यांसह तिचा पिछा सुरू केला असता तिने पळ काढला.
पोलिसांनी तिला शिताफीने ताब्यात घेतले आणि सखोल चौकशी केली. त्यावेळी तिने आतार यांच्या गळयातील चेन चोरल्याचे कबुल केले. पोलिसांनी तिच्याकडून 33 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा 2 लाख 30 हजार रूपयाचा ऐवज जप्त केला आहे.
गेल्या 15 दिवसांमध्ये स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेले सोने चोरीचे 4 गुन्हे व मोबाईल चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला असून त्यामध्ये पोलिसांनी 3 महिला व 3 पुरूषांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 60 ग्रॅम वजनाचे सोने असा 3 लाख 60 हजार रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. तपासादरम्यान 2 लाख 5 हजार रूपये किंमतीचे 16 स्मार्ट फोन देखील पोलिसांनी जप्त केले आहेत. एकुण 5 लाख 65 हजार रूपयाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.