- February 1, 2024
- No Comment
येरवडा परिसरात दहशत पसरवणाऱ्या प्रथमेश उर्फ गोट्या सुर्यवंशी टोळीवर ‘मोक्का’
पुणे : पुर्वीच्या वादातून डोक्यात व मानेवर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच तरुणाच्या मनगटाजवळ चावा घेऊन परिसरात दहशत माजणाऱ्या प्रथमेश उर्फ गोट्या राजेंद्र सुर्यवंशी व त्याच्या एका साथीदारावर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत 115 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे.
याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात आयपीसी 307, 325, 323, 506, 34 आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, फौजदारी सुधारणा कायदा कलम 3 व 7 नुसार गुन्हा दाखल केला आहे. दाखल गुन्ह्याचा तपास करुन टोळी प्रमुख प्रथमेश उर्फ गोट्या बाळासाहेब सुर्यवंशी (वय-24 रा. पर्णकुटी पायथा, येरवडा, पुणे), आकाश तायप्पा कानडे (वय-27 रा. शनि आळी, येरवडा, पुणे) यांना अटक केली आहे. हा प्रकार 19 डिसेंबर 2023 रोजी घडला होता.
टोळी प्रमुख प्रथमेश उर्फ गोट्या सुर्यवंशी याने वेगवेगळ्या साथीदारांच्या मदतीने परिसरात खुनाचा प्रयत्न करणे, दंगल माजवणे, गंभीर दुखापत करणे, तडीपार असतानाही हद्दीत प्रवेश करुन टोळीच्या मदतीने जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदा शस्त्र बाळगून परिसरात दहशत माजवणे तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देणे असे गंभीर गुन्हे केले आहेत.
येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii),
3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील करीत आहेत.