- December 5, 2024
- No Comment
मून थाई स्पावर छापा स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय मॅनेजरला अटक
पुणे : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणार्या मून थाई स्पावर भरोसा सेलच्या पथकाने छापा टाकून मॅनेजरला अटक केली आहे. स्पा मॅनेजर सताऊद्दीन मोहम्मद दिलवार हुसेन (वय २२, रा. जुनी सांगवी) असे अटक केलेल्या मॅनेजरचे नाव आहे.
याबाबत अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पोलीस हवालदार रेश्मा कंक यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर रोडवरील महाबळेश्वर हॉटेल शेजारील बापूसाहेब मुरकुटे पाटील कॉम्प्लेक्समधील मून थाई स्पा येथे स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुुरु असल्याची माहिती बातमीदाराकडून मिळाली. याबाबत खात्री करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठविले. या ग्राहकाने मिस कॉल देऊन पोलीस पथकाला इशारा केला. त्यानुसार पोलिसांनी मून थाई स्पावर छापा टाकला. तेथे असलेल्या सताउद्दीन हुसेन या मॅनेजरला अटक करुन वेश्या व्यवसाय करुन घेतला जाणार्या तीन महिलांची सुटका केली. बाणेर पोलीस ठाण्यात त्याच्यासह स्पा मालकावर अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.