- December 7, 2024
- No Comment
पती आणि पत्नीमध्ये वाद : जावयाने लावली सासूच्या घराला आग
पुण्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून पतीने चक्क सासऱ्याच्या घराला आग लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत घरातील काही वस्तू जळाल्याने नुकसान झाले. ही घटना कोथरूडमधील सुतारदरा परिसरात गुरुवारी मध्यरात्री घडली.
या प्रकरणी कविता किसन फेंगसे (वय ४१, रा. काळुबाई कॉलनी, सुतारदारा, कोथरुड) सासूने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यावरून पोलिसांनी जावई साहिल हनुमंत हाळंदे (वय २५, रा. भूगाव, ता. मुळशी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजल हिचा साहिल हाळंदे याच्याशी विवाह झाला आहे. त्यांना एक मुलगा आहे. तेजल हिची सासू कविता हाळंदे यांचा तक्रारदार यांना फोन आला. साहिल कोणत्यातरी मुलीसोबत फिरतो. त्यामुळे साहिलचा पत्नीशी वाद झाला. त्यामुळे पत्नी रागाच्या भरात बुधवारी रात्री माहेरी निघून गेली.
दरम्यान, साहिल गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सासुरवाडीत गेला. त्याने पत्नीला मी तुझ्या घराजवळ आलो आहे, तू पाच मिनिटांत माझ्यासोबत घरी आली नाहीस, तर तुझ्या आईचे घर जाळून टाकेन अशी धमकी दिली. त्यानंतर साहिलने सासूच्या घराला आग लावली. त्यात घरातील साहित्य जळाल्याने नुकसान झाले. कोथरूड पोलिसांनी पसार झालेल्या पतीला अटक केली आहे. पोलीस याबाबतीत अधिक तपास करीत आहेत.