- December 11, 2024
- No Comment
सहकारनगर परिसरात आम्ही इथले भाई आहोत, असे म्हणत टोळक्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षा, कार यांच्या काचा फोडून परिसरात दहशत
पुणे : कोणाचा तरी गेम करण्यासाठी आलेले असताना तो न मिळाल्याने आम्ही इथले भाई आहोत, असे म्हणत टोळक्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षा, कार यांच्या काचा फोडून सहकारनगर परिसरात दहशत माजवली. याबाबत श्रीरंग ज्ञानोबा शेलार (वय ५०, रा. हिलटॉप सोसायटी, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सौरभ ओतारी, सुमित दिघे (दोघे रा. धनकवडी) यांच्यासह तिघांना अटक केली आहे. तसेच त्यांच्या २० ते २५ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सावरकर चौकातील हिल टॉप सोसायटी रोडवर रविवारी रात्री पावणे दहा वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ ओतारी, सुमित दिघे व
त्यांचे २० ते २५ साथीदार हे गेम करण्यासाठी कोणाचा तरी शोध घेत हिलटॉप सोसायटी परिसरात आले होते. आरडाओरडा करत हातातील कोयते हवेत फिरवून आम्ही इथले भाई आहोत, जो कोणी आमचे समोर येईल व आमच्या नादाला लागेल, त्याला आम्ही सोडणार नाही, असे म्हणून लोकांच्या मनात दहशत निर्माण केली. ते कोणाचा तरी शोध घेत होते. तो मिळून न आल्याने त्यांनी रस्त्याच्या कडेला उभी असलेली अशोक सुर्वे यांची रिक्षा, फिर्यादी यांची रिक्षा यांच्या पुढील काचा फोडल्या.
सागर वाघिरे यांच्या कारच्या दोन्ही बाजूच्या काचा फोडून कोयत्याने गाड्यांवर वार करुन नुकसान केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. पोलीस हवालदार मानसिंग जाधव तपास करीत आहेत.