- December 18, 2024
- No Comment
किरकोळ वादात, सिलेंडरने मित्राच्या डोक्याचा केला चेंदामेंदा
पिंपरी: पुण्यातल्या दोन मित्रांनी बिर्याणीची पार्टी करण्याचा बेत आखला, यानंतर दोघांनी घरामध्येच बिर्याणी करण्याचं ठरवलं, पण याच बिर्याणीवरून एका मित्राने दुसऱ्याची हत्या झाली आहे.
मित्राच्या डोक्यात सिलेंडरची टाकी घालून ही हत्या केली गेली आहे. पुण्याच्या पिंपरीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. बिर्याणी चांगली झाली नाही, असं एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणाला, त्यामुळे संतापलेल्या मित्राने थेट सिलेंडरची टाकीच दुसऱ्या मित्राच्या डोक्यात घातली. रविवार 15 डिसेंबरला पिंपरीच्या दिघी भागात ही घटना घडली आहे.
संतोष शंकर खंदारे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. 45 वर्षांचे संतोष हे कामगार असून वाशिमहून पुण्यात कामासाठी स्थायिक झाले होते. तीनच महिन्यांपूर्वी संतोष खंदारे वाशिमहून पुण्यात कामासाठी आले, यानंतर त्यांना बांधकामाच्या साईटवर मिस्त्रीचं काम मिळालं. संतोष खंदारे आणि गणेश खंडारे हे दोघंही या बांधकाम साईटवर काम करायचे.
रविवार असल्यामुळे संतोष आणि गणेश यांनी बिर्याणीचा प्लान बनवला, यानंतर त्यांनी बिर्याणीसाठी लागणारं सगळं सामान आणलं. बिर्याणी बनवल्यानंतर दोघं जेवायलाही बसले, पण बिर्याणी चांगली झाली नसल्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाले. या वादाचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं आणि यातच गणेश खंडारेने संतोषच्या डोक्यात सिलेंडरची टाकीच घातली, ज्यात संतोषचा मृत्यू झाला. या प्रकरणी बद्री विठ्ठल चव्हाण (वय 35) यांनी तक्रार दिली, त्यानंतर पोलिसांनी आरोपी गणेश खंडारेला अटक केली आहे.