- December 20, 2024
- No Comment
सराईत गुन्हेगारांकडून दोन पिस्तुलांसह काडतुस जप्त, नांदेड सिटी पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी
पुणे: नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने दोन सराईत गुन्हेगारांकडून देशी बनावटीचे दोन पिस्तुले आणि एक जिवंत काडतुस जप्त केले आहे. आंबाईदरा येथे ही कारवाई करण्यात आली.
साजन विनोद शहा (वय १९, रा.धायरी, भैरवनाथ मंदिरा जवळ), कुणाल शिवाजी पुरी (वय १८, रा. विश्व कॉर्नर बिल्डिंग, भैरवनाथ मंदिरा समोर, धायरी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
शहा याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, मारमारीचे एकूण ६ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार पुरुषोत्तम गुन्ला व योगेश झेंडे यांना खबऱ्यामार्फत साजन शहा व कुणाल पुरी यांच्याकडे प्रत्येकी एक गावठी पिस्तूल असून हे दोघे आंबाईदरा येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याठिकाणी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीमध्ये ७० हजार ५०० रुपयांची दोन पिस्तुले आणि एक जीवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे, पोलीस अंमलदार पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, राजू वेगरे, अक्षय जाधव, प्रशांत काकडे यांच्या पथकाने केली आहे.