- December 21, 2024
- No Comment
पूर्ववैमनस्यातून दोघांवर कोयत्याने खुनी हल्ला ; एकाची प्रकृती गंभीर
पाषाण: पुर्ववैमनस्यातून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दोघांवर कोयत्याने सपासप वार करत खुनी हल्ला केला. दोघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
सुमित सुरेश क्षीरसागर (वय 20, रा. शिवनगर, सुतारवाडी, पाषाण) आणि सौरभ वाघमारे अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. यातील सुमित याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी बाणेर पोलिसांनी आदित्य दशरथ अवचरे (वय 19, रा. बालेवाडी) याला अटक केली असून, अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तर इतर चौघांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सुमित क्षीरसागर याने फिर्याद दिली आहे. हा प्रकार बुधवारी (दि.18) रात्री साडेदहाच्या सुमारास बाळु कोकाटे यांच्या कार्यालयासमोर शिवनगर पाषाण येथे घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण सुमित हा मूळचा अक्कलकोट तालुक्यातील असून, तो शहरातील एखा वॉशिंग सेंटरवर काम करतो. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तो आणि त्याचे मित्र येथील बाळू कोकाटे यांच्या कार्यालयासमोर शेकोटी करून गप्पा मारत बसले होते. त्या वेळी दोन दुचाकीवर पाच ते सहा जणांचे टोळके तेथे आले. अचानक टोळक्याने सुमित याच्यावर सशस्त्र हल्ला केला. सुमित याने मारहाण करण्याचे कारण टोळक्याला विचारले असता, ते म्हणाले की, तुम्ही आदित्य अवचरे भावाच्या विरोधात का जाताय, असे म्हणून आरोपींनी सुमित याच्या डोक्यात आणि हाताच्या मनगटावर वार केले. सुमीत मेला आहे असे आरोपींना वाटल्यानंतर त्यांनी तेथून पळ काढला. सुमीत याला त्याच्या मित्रांनी एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. पुढे तेथून त्याला ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात पाठवून देण्यात आले. सुमित याचा मित्र सौरभ यालादेखील आरोपींनी मारहाण केली असून, त्याच्यावर लवळे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींना पकडण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी आदित्य अवचरे याला अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तर इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश थिटे करीत आहेत.