- December 21, 2024
- No Comment
अल्पवयीन मुलीवर पळवून नेऊन बलात्कार; आरोपीला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
खेड: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन बलात्कार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी गुरुवारी (दि.१९) सुनावली आहे.
स्वप्निल बबन सावंत (वय ३४, रा. कडधे, ता. खेड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
या खटल्याची हकीकत अशी की, आरोपी स्वप्निल याने लग्नाचे आमिष दाखवत राजगुरुनगर येथून दि. १८ सप्टेंबर २०१६ रोजी १६ वर्षीय मुलीला तिच्या राहत्या घरातून पळवून नेले होते. खेड पोलिस ठाण्यात याबाबत पीडित मुलीच्या पालकांनी त्या वेळी फिर्याद दिली होती. पळवून नेल्यानंतर अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून १८ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर २०१६ या काळात तिच्यासोबत आरोपीने शारीरिक संबंध ठेवले.
पीडित मुलगी मिळून आल्यानंतर खेड पोलिस ठाण्यात पुन्हा फिर्याद देण्यात आली. त्यानुसार विविध कलमांखाली गुन्हा दाखल होता. या गुन्हाचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक गणेश म्हस्के यांनी केला. हा खटला राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. पी. पोळ यांच्या न्यायालयात सुरू होता. या खटल्यात विशेष सरकारी अभियोक्ता व्ही. एन. देशपांडे यांनी १० साक्षीदार तपासले.
पीडित मुलगी, पीडितेची आई, तपास अधिकारी, डॉक्टर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. यात आरोपीला दोषी धरण्यात आले. आरोपी सावंत याला भादंवि ३७६ अन्वये ७ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा २०१२ चे कलम ६ अन्वये १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायाधीशांनी सुनावली. दंडाची रक्कम वसूल झाल्यानंतर पीडितेला देण्याचे आदेश दिले. या खटल्याचे कोर्ट पैरवी कामकाज पोलिस हवालदार विजय चौधरी यांनी पाहिले.