- December 21, 2024
- No Comment
दारुच्या नशेत सिलेंडर डोक्यात मारुन खून; आरोपी २४ तासात गजाआड
आळंदी येथील काळे कॉलनीत दारु पित असताना झालेल्या वादात सिलेंडर डोक्यात मारुन खुन करुन पळून गेलेल्या मजुराला दिघी पोलीस व गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने २४ तासाच्या आत जेरबंद केले.गणेश दिगंबर खंडारे (वय २५, रा. काळे कॉलनी, आळंदी) असे या आरोपीचे नाव आहे. संतोष शंकर खंदारे (वय ४५, रा. काळेवाडी, आळंदी) यांचा खून करण्यात आला होता.
गणेश खंडारे हा संतोष खंदारे याच्या हाताखाली मजुरीचे काम करीत असत. १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ते दारु पित बसले होते. त्यावेळी जेवण व्यवस्थित बनविले नाही यावरुन त्यांच्यात वाद झाला. तेव्हा गणेश याने संतोष यांच्या डोक्यात घरातील सिलेंडर मारला. त्यात संतोष हा निपचित पडला. हे पाहून गणेश पळून गेला होता. १५ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता खुनाचा हा प्रकार उघडकीस आला.
गुन्हे शाखेच्या युनिटचे पोलीस हवालदार राजू जाधव यांनी उपलब्ध मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करुन तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा शोध सुरु केला. गणेश खंडारे याचे नाव निष्पन्न झाले. त्याला सापळा रचून पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे, विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, विनायक पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अंभोरे, हवालदार नागरगोजे, राख, पोलीस अंमलदार डोळस, साळवे, मुंडे, जाधव, वाघमारे, कसबे तसेच पोलीस उपनिरीक्षक गिरी, संदीप सोनवणे, शशिकांत नागरे, राजकुमार हणमंते, विठ्ठल सानप, यदु आढारी, समीर काळे, योगेश्वर काळेकर, त्रिनयन बाळसराफ, मनोज साबळे यांनी केली आहे.