- December 21, 2024
- No Comment
लोहगावमध्ये टोळक्याची दहशत; दहा वाहनांची तोडफोड, कोयते उगारुन तिघांना मारहाण
लोहगाव: वैमनस्यातून लोहगाव भागात टोळक्याने दहशत माजविली. वैमनस्यातून तिघांवर कोयत्याने वार करुन त्यांचा खुनाचा प्रयत्न केला, तसेच आठ दुचाकी, एक माेटार, रिक्षाची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली.
टोळक्याने केेलेल्या हल्ल्यात संदीप नंदकुमार आढाव (वय ३५, रा. जाधवनगर, विश्रांतवाडी), सलीम बागवान आणि त्यांचा मुलगा अदियान जखमी झाला. याबाबत आढाव यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी निकेश पाटील (वय २१, रा. खंडोबानगर, लोहगाव) याला अटक करण्यात आली. त्याच्याबरोबर असलेले साथीदार अक्षय संजय सगळगिळे (वय २०, रा. संतनगर, लोहागव) आणि एका अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आढाव त्यांच्या दुकानासमोर मित्र बागवान याच्यासोबत गप्पा मारत थांबले होते. बागवान यांचा मुलगा तेथे थांबला होता. आरोपींनी आढाव यांच्यावर कोयत्याने वार केला. त्यांच्या दुकानाचा फलक तोडला, तसेच शेजारी असलेल्या सराफी पेढीच्या फलक तोडला. भांडणात मध्यस्थी करणारे बागवान यांना कोयत्याच्या दांडक्याने मारहाण केली. आढाव यांच्या दुकानासमोर लावलेल्या पाच दुचाकींची तोडफोड केली. धानोरी जकात नाका परिसरात एक मोटार, रिक्षा आणि तीन दुचाकींची तोडफोड केली. कलवड वस्ती परिसरातील एका ओैषध विक्री दुकानाची तोडफोड केली. या भागातील एस. बी. चायनीज सेंटरमधील साहित्याची तोडफोड केली.
बागवान यांचा मुलगा अदियानला दगड फेकून मारला. या घटनेची माहिती मिळताच रात्रपाळीत गस्त घालणारे परिमंडळ एकचेपोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त रंगराव उंडे, प्रांजली सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पसार झालेला आरोपी निकेश पाटील याला अटक करण्यात आली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक धामणे तपास करत आहेत.