- December 24, 2024
- No Comment
बेगडेवाडी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेचा अपघात,काही प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी
पिंपरी: पुणे-लोणावळा मार्गावरील बेगडेवाडी रेल्वे स्थानकाजवळ पेरांबूर-प्रयागराज कुंभ एक्स्प्रेसचे दोन डब्बे रेल्वे रुळावरून घसरून अपघात झाला आहे. यामध्ये काही प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले असल्याचा दूरध्वनी सकाळी पुणे रेल्वेच्या नियंत्रण कक्षात धडकला.
तातडीने ‘मेडिकल रिलीफ व्हॅन’ घटनास्थळाकडे रवाना झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थानिक अधिकारी घटनास्थळावर पोचले. त्यावेळी रेल्वे प्रशासनाकडून हे सर्व मॉकड्रिल असल्याचे जाहीर केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
लोणावळा रेल्वे मार्गावर पेरांबूर-प्रयागराज कुंभ एक्स्प्रेसचे डबे रुळावरून खाली घसरल्याचा फोन पुणे रेल्वे नियंत्रण कक्षात सकाळी नऊ वाजून २० मिनिटांनी आला. त्यानंतर तत्काळ पुण्यातील मेडिकल रिलीफ व्हॅनला (एआरएमई) कळविण्यात आले. तसेच पुणे रेल्वे विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना अपघाताची माहिती देण्यात आली. अपघातामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून ‘ओएचई’चा वीजपुरवठा बंद करण्यात आला.
पुण्याची ‘मेडिकल रिलीफ व्हॅन’ घटनास्थळाकडे रवाना झाली. स्थानिक रेल्वे स्थानक प्रबंधक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सर्वजण अलर्ट असल्याचे लक्षात आल्यानंतर गाड्यांच्या वेळापत्रकांवर कोणताही परिणाम होऊ नये, म्हणून सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी हे सर्व मॉकड्रील असल्याचे जाहीर करण्यात आले. धावपळ उडालेल्या सर्व रेल्वे अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
या मॉकड्रिलमध्ये सर्व सुरक्षाविषयक गोष्टी व्यवस्थित असल्याचे दिसून आले. मदत आणि बचाव कार्यादरम्यान, एनडीआरएफ कमांडंट एस. बी. सिंग, डेप्युटी कमांडंट प्रवीण धस, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता शादाब जमाल आणि विजयसिंह दडस, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता नारायण माहेश्वरी, वरिष्ठ विभागीय अभियंता मनीष सिंह, वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी राजेंद्रकुमार कथल, पुणे रेल्वे रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी एन.के. संजीव, वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, सहाय्यक विभागीय सुरक्षा अधिकारी दिलीप तायडे आदी उपस्थित होते.