- December 24, 2024
- No Comment
छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान स्थळावर विकास कामांची पाहणी, बलिदान स्थळावर कॉन्ट्रॅक्टरला अजित पवारांनी दिला दम
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार आपली कार्यपद्धती, बिनधास्तपणा आणि सडेतोड बोलण्यामुळे ओळखले जातात. अजित पवार कोणाची मुलाहिजा ठेवत नाही. आपल्या रोखठोक स्वभावामुळे ते ओळखले जातात.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान स्थळावर विकास कामांची पाहणी केली. कामे लवकर पूर्ण होत नसल्याने अजित पवारांनी कॉन्ट्रॅक्टरला बोलवून खडे बोल सुनावले
अजित पवारांनी पाहणी दरम्यान कॉन्ट्रॅक्टरची चांगलीच कानउघाडणी केली.
संभाजी महाराज माझे दैवत आहे. हे संभाजी महाराजांचे काम आहे. मुकाट्याने काम सोडून दे… नाहीतर साऱ्या गावाला सांगतो याच्याने काम होणार नाही. तुझ्याकडून हे काम होणार नाही मला तुला काम द्यायचं नाही.
तू दुसरं कुठलं काम बघ, तू काम करू शकत नाही. या भानगडीत पडू नको. आमच्या सगळ्याचा भावनिक प्रश्न आहे. काहीच काम झाले नाही,
असा दम भरला..
तुळापूर येथील स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधून महाराजांचा गौरवशाली इतिहास जगासमोर येईल तसेच जगाला हेवा वाटेल अशा स्वरूपात उभारण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
पवार म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ विकासकामे करताना ऐतिहासिक दृश्यस्वरुपातील आणि दर्जेदार साहित्याचा वापर करावा. विकासकामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील, याकडे लक्ष द्यावे. कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी. विकासकामे करताना दगडी कातीव, कोरीव बांधकाम, मातीच्या वैविध्यपूर्ण विटा आदींचा वापर करत बांधकामाला मजबुती येईल अशा पद्धतींचा अवलंब करावा.
नदीच्या कडेला बांधकाम करताना नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला कोणताही बाधा येणार नाही यासाठी सर्व पर्यावरणाच्या नियमांचे पालन करावे; तसेच नदीच्या अनुषंगाने लाल रेषा, निळी रेषाबाबतच्या अटींचे काटेकोर पालन करावे. परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या आहेत.