- December 24, 2024
- No Comment
पुण्यात कोयता गँगची दहशत सुरुच

पुणे: पुण्यात कोयता गँगची दहशत सुरुच असून लोहगाव येथील साठे वस्ती परिसरात दोन तरुणांनी कोयता आणि दगडांचा वापर करून वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
दोन तरुणांनी परिसरातील गाड्या, दुकानं, तसेच रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवर कोयत्याने वार करत तोडफोड केली. या कृत्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनास्थळी झालेल्या तोडफोडीमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत हे तरुण कोयता हातात घेऊन परिसरात उघडपणे दहशत निर्माण करत असल्याचे दिसत आहे. या प्रकारामुळे साठे वस्ती परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी याबाबत तत्काळ दखल घेतली असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचं आणि घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे. स्थानिक रहिवाशांनी घडलेल्या प्रकारामुळे पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून, दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, कोयता गॅंगचा हा प्रकार काही दिवसांपासून शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. अशा घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही सवाल उपस्थित केला जात आहे. या घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे. याबाबत आणखी माहिती उपलब्ध होताच पुढील कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.