• December 26, 2024
  • No Comment

उद्योगमंत्र्यांनी बैठक घेताच ‘एमआयडीसी’तील प्रलंबित कामांना गती

उद्योगमंत्र्यांनी बैठक घेताच ‘एमआयडीसी’तील प्रलंबित कामांना गती

पिंपरी: भोसरीतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) स्थापनेपासून रखडलेल्या औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्राच्या प्रस्तावाला गती मिळणार आहे. याबाबतची निविदा लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.

तसेच भूमिपूजनानंतर दीड वर्षांपासून रखडलेल्या सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांना गती मिळण्याची अपेक्षा उद्योजकांनी व्यक्त केली आहे.

एमआयडीसीच्या स्थापनेपासून औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्राचे एच ब्लॉक येथे आरक्षण आहे. त्याबाबत सातत्याने बैठका झाल्या, पण प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही. दोन दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बैठक घेऊन उद्योजकांच्या समस्या सोडविण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले. त्यानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अग्निशमन केंद्राची निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. लवकरच निविदा प्रसिद्ध केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

शहरातील उद्योगांमध्ये निर्माण होणार्या रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिका, एमआयडीसी, पीसीएमसी सीईटीपी फाउंडेशन आणि एमपीसीबी यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी एमआयडीसीतील गवळी माथा येथील प्लॉट क्रमांक टी १८८/१ येथील एक एकर क्षेत्रात सरासरी एक दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेचा सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प गतवर्षी हाती घेतला होता. कामाचे भूमिपूजनही झाले. मात्र, औद्योगिक पाण्यावर प्रक्रिया कोणी करायची, कोणत्या उद्योगांमधून कोणत्या प्रकारचे रसायनमिश्रित पाणी येते याची तपासणी करण्यासाठी विलंब झाला. प्रकल्पाची क्षमता वाढविण्याची उद्योजकांची मागणी होती. आता चार एकर क्षेत्रफळामध्ये २७ दशलक्ष लिटर क्षमतेचा सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियोजन सुरू आहे. त्याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) अंतिम टप्प्यात आहे.

कचऱ्याचा प्रश्न ‘घातक’

भोसरी एमआयडीसीत घातक कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले असतात. महापालिका एमआयडीसीत घातक कचरा प्रक्रिया प्रकल्प राबवत नाही. उद्योजकांना रांजणगाव येथील एका खासगी कंपनीच्या प्रकल्पात कचरा देण्याचे आवाहन केले जाते. मात्र, हा प्रकल्प कमी क्षमतेचा आहे. कचरा उचलण्याची क्षमता त्यांच्याकडे नाही. या प्रकल्प व्यवस्थापकाबरोबर कचरा उचलण्याबाबतचे कोणतेही धोरण महापालिकेने ठरवून दिलेले नाही. यामुळे येथील उद्योजकांची अडचण होत आहे.

अग्निशमन केंद्राबाबत लवकरच निविदा काढली जाणार आहे. त्यानंतर तत्काळ कामाला सुरुवात केली जाईल. सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता आणि क्षेत्रफळ वाढविण्यात येणार आहे. त्याचा सुधारित प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे, असे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

एमआयडीसीतील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी उद्योमंत्री उदय सामंत सकारात्मक आहेत. त्यांनी अग्निशमन केंद्र, सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम सुरू करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे हे प्रश्न लवकर सुटतील असा विश्वास असल्याचे पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी म्हटले आहे.

Related post

घरात घुसून ९ वर्षीय मुलीवर ‘लैंगिक अत्याचार’; १९ वर्षीय तरूणाला १० वर्षे ‘सक्तमजुरी’

घरात घुसून ९ वर्षीय मुलीवर ‘लैंगिक अत्याचार’; १९ वर्षीय…

पुणे: बेकायदेशीरपणे घरात घुसून नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला १० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व…
महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून २१ लाख २० हजार रुपये घेतले. मात्र, नोकरीला न लावता तसेच रक्कम परत…
थकबाकीदारांच्या १६ हजार २६५ मालमत्ता सील; महापालिकेकडून धडक कारवाई

थकबाकीदारांच्या १६ हजार २६५ मालमत्ता सील; महापालिकेकडून धडक कारवाई

पिंपरी: मार्च अखेर जवळ येत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई तीव्र केली आहे. आतापर्यंत तब्बल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *