- December 27, 2024
- No Comment
लाच देणारा गजाआड, लाललुचपत प्रतिबंधक विभागाची उल्लेखनीय कामगिरी

पुणे: लाच देणं आणि घेणं हा गुन्हा आहे. त्यानंतरही एखादं काम करण्यासाठी लाच देण्याचे प्रकार घडत असतात. पण, पुण्यात घडलेल्या एका दुर्मीळ प्रकारात लाच घेणाऱ्याला नाही तर देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
हसन अली गुलाब बारटक्के (वय 45) असं या प्रकरणातल्या आरोपीचं नाव आहे. त्याला लाललुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एका स्थावर मालमत्ता एजंटला एका फौजदारी खटल्याचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न करताना अटक केली.तो 2,000 रुपयांची लाच देताना एसीबीने लावलेल्या सापळ्यात पकडला गेला.
बारटक्के आपल्याला वारंवार लाच देण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती बंडगार्डन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांनी एसीबीला दिली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
तपास हाताळणारे एपीआय कदम यांनी लाच घेण्यास नकार देत एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर एसीबीने स्टिंग ऑपरेशनची योजना आखली आणि अंमलात आणली. ताडीवाला रोड पोलीस चौकीत बारटक्के यांनी एपीआय कदम यांच्याकडे 2,000 रुपये सुपूर्द केले, त्यावेळी त्यांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.शीतल जानवे यांनी या कारवाईचे निरीक्षण केले. बारटक्के यांच्यावर सार्वजनिक सेवकाला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.