- December 30, 2024
- No Comment
10 लाखांची गाडीही गेली आणि पैसेही गेले, टेलिग्रामवर जाहिरात पडली महागात
पुणे: इर्टिगा कार मासिक भाड्याने देण्यासाठी तरुणाने टेलिग्रामवर जाहिरात टाकली. त्याला एकाने प्रतिसाद देऊन महिना ५२ हजार रुपये भाडे ठरविले. करार केला. गाडी घेऊन गेला तो परत आला नाही. त्यामुळे तरुणाला भाडेच नाही तर १० लाख रुपयांच्या गाडीही गमवावी लागली.
याबाबत औंध येथे राहणार्या एका २४ वर्षाच्या तरुणाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मयुर रत्नाकर जाधव (रा. जयदिप अपार्टमेंट, आव्हाळवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २५ सप्टेंबर ते २७ डिसेंबर २०२४ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांची १० लाखांची इर्टिगा गाडी मासिक भाड्याने द्यायची होती. त्यांनी तशी जाहिरात टेलिग्रामवर केली. मयुर जाधव याने भाड्याने गाडी घेण्याची तयार दर्शविली. गाडीचे मासिक भाडे ५२ हजार रुपये ठरले. तसा करार करण्यात आला. २५ सप्टेंबर रोजी तो गाडी घेऊन गेला. त्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी त्याने २५ हजार रुपये फिर्यादी यांना पाठविले.
तेव्हा त्यांनी मयुरला फोन करुन तीन महिन्याचे १ लाख ३१ हजार रुपये मागितले.
तेव्हा त्याने मी अहमदाबाद येथे चाललो आहे. तुमची गाडी माझ्याकडे थांबवून असून मी तुम्हाला पैसे देतो, असे सांगितले. फिर्यादी यांनी पैसे द्या नाही तर गाडी मला परत करा असे सांगितले. तेव्हा तुम्ही अहमदाबाद येथे या. तुमची गाडी व पैसे माझ्याकडून घेऊन जा, असे सांगितले. त्यानंतर २८ नोव्हेंबरनंतर त्याचा मोबाईल बंद लागत असल्याने शेवटी त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली.
पोलीस उपनिरीक्षक चौगुले तपास करीत आहेत.