- December 30, 2024
- No Comment
हप्ता न दिल्यास स्वीट होम जाळून टाकण्याची धमकी; तीन टाळक्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल
पुणे: दुकानात येऊन समोसा व कचोरी खाल्याचे पैसे मागितल्यावर गुंडांनी दुकान चालू ठेवायचे असेल तर हप्ता द्यावा लागेल, हप्ता दिला नाही तर स्वीट होम जाळून टाकीन अशी धमकी दिली.
याबाबत भरत चौधरी (वय २७, रा. ज्ञानेश सोसायटी, वारजे माळवाडी) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विनीत दांगट व त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वारजे येथील रामनगरमधील धनश्री स्वीट होम दुकानामध्ये शनिवारी सकाळी पावणे दहा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांचे वडिल व कामगार स्वीट होममध्ये काम करत होते. त्यावेळी विनीत दांगड त्याच्या दोन मित्रांसह दुकानात आला. त्यांनी समोसा व कचोरी खाल्ली़ फिर्यादीने त्याचे बिल मागितले.
याचा राग येऊन त्यांनी फिर्यादीला हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. ‘तुला इथे धंदा करायचे असेल तर आम्हाला व माझ्या मित्रांना दर महिन्याला हप्ता द्यावा लागेल. नाही तर तुला इथे धंदा करुन देणार नाही. तुला खल्लास करुन टाकीन व तुझे स्वीट होत जाळून टाकीन,’ अशी धमकी देऊन ते बिल न देता निघून गेले.
पोलीस उपनिरीक्षक बरसट पुढील तपास करीत आहेत.