- January 1, 2025
- No Comment
बंदोबस्तावरून घरी जाताना काळाचा घात, पोलीस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू
पिंपरी: वर्षाखेरीस दिवस-रात्र बंदोबस्त करून पहाटे घरी जात असताना एका पोलीस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 1 जानेवारी) पहाटे महाळुंगे येथे घडली. जितेंद्र गिरनार असे मृत्यू झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र गिरनार हे महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. वर्षाखेरीस ते दिवस-रात्र बंदोबस्तासाठी तैनात होते. बुधवारी पहाटे बंदोबस्त संपवून ते घरी जात होते. महिंद्रा कंपनी जवळ आले असता त्यांच्यासमोर एक कंटेनर जात होता. गिरनार यांच्या क्रेटा कारची कंटेनरला पाठीमागून धडक बसली. या अपघातात पोलीस उपनिरीक्षक गिरनार गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गिरनार मागील काही वर्षांपासून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहेत. पूर्वी ते वाकड पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. त्यानंतर मागील काही महिन्यांपूर्वी त्यांची महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात बदली झाली होती. वर्षाच्या सुरुवातीलाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. गिरनार यांचे अपघाती निधन झाले.