- January 2, 2025
- No Comment
पुणे: कुटुंबातील तिघांवर काळाचा घात; पती, पत्नी, मुलगी ठार

कल्याण-अहिल्यानगर या महामार्गावर अद्यापही अपघातांची मालिका सुरू असून नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला.
मढ (ता. जुन्नर) हद्दीतील सीतेवाडी फाट्यानजीक बुधवारी (दि. १) दुपारी साडेतीन वाजता हा भीषण अपघात झाला. नीलेश कुटे, पत्नी जयश्री कुटे व मुलगी श्रावणी कुटे (तिघे रा. नवलेवाडी, पिंपरी पेंढार, ता. जुन्नर) अशी या अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटे दाम्पत्य आपल्या मुलीसह ओतूरकडून कल्याणच्या दिशेने दुचाकीवरुन (एमएच ०५ बीएक्स ४८२४) जात होते. यावेळी कल्याणहून ओतूरच्या दिशेने कार (एमएच १६ एटी ०७१५) येत होती. मढ हद्दीतील सीतेवाडी फाट्यानजीक असलेल्या देवेंद्र हॉटेलसमोर दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील कुटे दाम्पत्यासह मुलगी श्रावणीचा जागीच मृत्यू झाला.
या गंभीर अपघाताची खबर मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप आमने, पोलीस कॉन्स्टेबल युवराज जाधव, किशोर बर्डे, जोतिराम पवार हे तातडीने घटनास्थळी हजर झाले व घटनास्थळावरील परिस्थिती नियंत्रणात आणली. नवीन वर्षाच्या पहिल्या पहिल्याच दिवशी एकाच कुटुंबातील तिघांवर काळाने झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.




