- January 8, 2025
- No Comment
पिंपरी चिंचवड येथील डांगे चौक परिसरात अनधिकृत बांधकामांवर हातोडा; PCMC कडून मोठी कारवाई

पिंपरी-चिंचवड: चिंचवडमहापालिका अतिक्रमण विरोधी पथकाने वाकड, डांगे चौक आणि दत्त मंदिर परिसरात जोरदार मोहीम राबवली.
या मोहिमेमध्ये अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या अनेक इमारतींवर हातोडा चालवत त्या जमीनदोस्त करण्यात आल्या. परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी सदर इमारतींचे अतिक्रमण हटविणे आवश्यक होते. त्यामुळे पालिकेने ही विशेष कामगिरी हाती घेतली. त्यासाठी पालिकेने जेसीबी, बुलडोझर आणि तत्सम यंत्रांचा वापर केला. प्रशासनाकडून राबविण्यात आलेली ही कारवाई म्हणजे शहरव्यवस्थापन, रस्तारुंदीकरण आणि नागरी सुविधांच्या पूर्ततेचा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे.
पिंपरी चिंचवड महानगर पालिका हद्दीमध्ये पाठिमागील काही वर्षांपासून अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहेत. ज्याचा परिणाम शहरं अवाढव्य आणि कोणत्याही धारबंधांशिवाय वाढू लागली आहेत. परिणामी त्यामध्ये कोणत्याही प्रकारची सूत्रबद्धता पाहायला मिळत नाही. इतकेच नव्हे तर नागरिकांना वाटेल तशा अव्यवस्थितपणे वाढणाऱ्या इमारती अनेकदा दाटीवाटी आणि रहदारीस कारण ठरतात. परिणामी कोरोना महामारीसारखी आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास परिस्थिती हाताळणे प्रशासनास कठीण होऊन जाते. शिवाय, इमारीती दाटीवाटीने उभ्या असल्याने रस्ते अरुंद होतात. परिणामी काही अप्रिय घटना घडल्यास प्रशासनाला तातडीची मदत उपलब्ध करण्यात मोठा अडथळा निर्माण होतो.




