- January 9, 2025
- No Comment
चक्क अतिक्रमणविरोधी पथकाला धक्काबुक्की; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे: नामदार गोपाळ कृष्ण गोखले पथ (फर्ग्युसन रस्ता) परिसरातील पदपथावर बेकायदा पथारीवाल्यांविरुद्ध कारवाई करणाऱ्या अतिक्रमणविरोधी पथकाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सोमवारी सायंकाळी फर्ग्युसन रस्त्यावरील सागर आर्केड परिसरात ही कारवाई केली होती.
याप्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी सचिन घेंगे (२९, रा. मांजरी) यांनी डेक्कन पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्ग्युसन रस्त्यावरील पदपथावर बेकायदा पथारी थाटून फेरीवाल्यांकडून बेकायदा व्यवसाय केला जातो. पादचाऱ्यांना पदपथावरून चालताही येत नसल्याच्या महापालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर अतिक्रमण विभागाकडून बेकायदा पथारी व्यावसायिक, फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळी फर्ग्युसन रस्त्यावरील सागर आर्केड परिसरात फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत होती.
त्या वेळी महिलेसह चौघांनी अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.