- January 10, 2025
- No Comment
आम्ही इथले भाई म्हणत गुंडांनी केली वाहनांची तोडफोड, हवेत कोयते फिरवून पसरविली दहशत, हडपसरमधील ससाणेनगरमधील धक्कादायक प्रकार
हडपसर: आम्ही इथले भाई म्हणत टोळक्याने सोसायटीत शिरुन वाहनांची तोडफोड केली. हवेत कोयते फिरवून कोणी मध्ये आले तर त्यांना जीवे मारु अशी धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत लहु अंजु बुधनर (वय २७, रा. ससाणेनगर, हडपसर) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी स्वप्नील शितोळे (रा. जोगेश्वरी कॉलनी), सोहम शितोळे (रा. सातवनगर) बालाजी मुंडे (रा. ससाणेनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ससाणेनगरमधील नाईकनवरे सोसायटीत बुधवारी पहाटे २ वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संगनमत करुन सोसायटीत शिरले. त्यांनी सोसायटीतील लोकांच्या वाहनांची तोडफोड करुन नुकसान केले. आम्ही इथले भाई असून आमच्या नादाला लागला तर हेच परिणाम भोगावे लागतील, असे म्हणून त्यांच्या हातातील तलवारी व लोखंडी धारदार हत्यारे हवेत फिरवून कोणी मध्ये आले तर त्यांना जीवे मारु, अशी धमकी देऊन शिवीगाळ करत ते निघून गेले. सहायक पोलीस निरीक्षक अमित शेट्टे तपास करीत आहेत.